रोहित शर्मा आणि शुभमन गिल (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs AUS 4th Test Day 4: ब्रिस्बेन टेस्टच्या चौथ्या दिवसाच्या अंतिम सत्रात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे दिवसाचा खेळ वेळेपूर्वीच थांबवण्यात आला. दिवसाखेर कांगारू संघाला दुसऱ्या डावात 294 धावांवर गुंडाळत टीम इंडियाने बिनबाद 4 धावा केल्या. दुसऱ्या डावात फलंदाजीला आल्यावर पावसाला सुरुवात झाली ज्यामुळे खेळ थांबवण्यात आला, मात्र पावसाच्या हलक्या सरी सुरूच राहिल्यामुळे अखेर खेळ थांबवण्याचा निर्णर पंचांनी घेतला. टीम इंडियाकडून शुभमन गिल आणि रोहित शर्मा ही सलामी जोडी मैदानात आहे. रोहित 4 धावा करून खेळत होता तर शुभमनला खातं उघडण्याची संधी मिळाली नाही. अशाप्रकारे, टीम इंडियाला आता पाचव्या आणि अंतिम दिवशी विजयासाठी आणखी 324 धावांची गरज आहे. यापूर्वी, ऑस्ट्रेलिया संघ दुसर्‍या डावात 294 धावांवर ऑलआऊट झाला होता. संघाच्या दुसऱ्या डावात मधल्या फळीतील अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 74 चेंडूंत 55 धावांची अर्धशतकी खेळी खेळली. तर भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 5 आणि शार्दूल ठाकूरने 4 विकेट घेतल्या. वॉशिंग्टन सुंदरला 1 विकेट मिळाली. (IND vs AUS 4th Test 2021: गब्बा येथे टीम इंडियाच्या विजयाचा मार्ग खडतर, सामना अनिर्णित राहिल्यास भारताला हॅटट्रिकची संधी, वाचा सविस्तर)

स्मिथशिवाय संघाचा सलामीवीर डेविड वॉर्नरने 75 चेंडूत 6 चौकारांसह 48 धावा केल्या, मार्कस हॅरिसने 82 चेंडूंत आठ चौकारांसह 38 धावा केल्या. मार्नस लाबूशेनने 22 चेंडूत पाच चौकारांसह 25 धावा ठोकल्या. मॅथ्यू वेड भोलाही फोडू शकला नाही. कॅमरून ग्रीनने 90 चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने 37 धावा, तर कर्णधार टिम पेनने 37 चेंडूंत तीन चौकारांच्या मदतीने 27 धावा फटकावल्या. जोश हेजलवुडने 11 चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने 28 आणि पॅट कमिन्सने 51 चेंडूत दोन चौकार व एका षटकाराच्या मदतीने नाबाद 28 धावा केल्या. दुसऱ्या डावात सिराजने अनुभवी फलंदाज स्मिथ, लाबूशेन, वेड, मिचेल स्टार्क आणि हेजलवुडला माघारी धाडलं.

दरम्यान, चार सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी टेस्ट मालिका 1-1 अशी बरोबरीत असून खेळाच्या पाचव्या आणि अंतिम दिवशी विजयी संघाचा निर्णय होईल. सामना ड्रॉ झाल्यास टीम इंडियाकडे ट्रॉफी कायम राहील. तर यजमान संघाने विजय मिळवल्यास 2019-20 च्या पराभवाचा बदला घेण्याच्या ते निर्धारित असतील.