टीम इंडिया (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs AUS 4th Test Day 4: ब्रिस्बेनमध्ये (Brisbane) दुसऱ्या डावात यजमान ऑस्ट्रेलिया (Australia) संघाने 75.5 ओव्हरमध्ये 294 धावांपर्यंत मजल मारली आणि टीम इंडियापुढे (Team India) विजयासाठी 328 धावांचं तगडं आव्हान दिलं. पहिल्या डावात 33 धावांची आघाडी घेतल्यावर संघाने गब्बा (Gabba) येथे चौथ्या दिवशी आक्रमक बॅटिंग करत आघाडी त्रिशतकी पार नेली. यजमान संघासाठी दुसऱ्या डावात स्टिव्ह स्मिथने (Steve Smith) सर्वाधिक 55 धावा केल्या. डेविड वॉर्नरने 48 धावा, मार्कस हॅरिसने 38 तर कॅमरुन ग्रीनने 37 आणि कर्णधार टिम पेनने 27 धावांचे योगदान दिले. टीम इंडियाचे गोलंदाज नियमित अंतराने विकेट घेत राहिले, पण मॅथ्यू वेड कांगारू संघाच्या प्रत्येक फलंदाजाने प्रभावी योगदान देत धावसंख्येची गट वाढवली आणि भारतापुढे धावांचं आव्हान देण्यास महत्वाची भूमिका बजावली. भारताकडून मोहम्मद सिराज (Mohammed Siraj), शार्दूल ठाकूरने (Shardul Thakur) चेंडूने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी बजावली.  मोहम्मद सिराजने सर्वाधिक 5 आणि शार्दूलने 4 विकेट घेतल्या. वॉशिंग्टन सुंदरला 1 विकेट मिळाली. (IND vs AUS 4th Test Day 4: ब्रिस्बेन टेस्टमध्ये रोहित शर्मा याच्याकडून स्टिव्ह स्मिथच्या डर्टी गेमची पुनरावृत्ती? पहा Video)

चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शानदार सुरुवात केली. शार्दूलने हॅरिस आणि वॉर्नर या दोघांची सेट जोडी मोडली. शार्दूलने हॅरिसला 38 धावांवर बाद केलं. त्यानंतर वॉर्नरला वॉशिंग्टन सुंदरने 48 धावांवर एलबीडबल्यू बाद करत पॅव्हिलियनमध्ये पाठवलं. यानंतर सिराजने जबाबदारी घेत 31व्या ओव्हरमध्ये लाबूशेन आणि वेडला आऊट करत कांगारुंना 2 धक्के दिले. लाबूशेनने 25 धावा केल्या, तर वेडला भोपळाही फोडता आला नाही. सिराजने नंतर स्मिथला 55 धावांवर कर्णधार रहाणेच्या हाती कॅच आऊट करत विरोधी संघाला मोठा धक्का दिला. कॅमरुन ग्रीनही मोठी खेळी करू शकला नाही आणि ठाकूरने त्याला रोहितच्या हाती 37 धावांवर आऊट केलं. कर्णधार पेन 27 धावा करुन परतला. गोलंदाजांमध्ये पॅट कमिन्सने 24, नॅथन लायनने 13 धावांचे योगदान दिले.

चार सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत आहेत. ब्रिस्बेन येथील अंतिम सामना जिंकत दोन्ही संघाना मालिका विजयाची संधी आहे, पण सामना अनिर्णीत राहिल्यास नियमांनुसार मालिका टीम इंडियाकडेच कायम राहिल.