IND vs AUS 4th Test 2021: ब्रिस्बेन टेस्ट (Brisbane Test) सामन्यात कोणत्याही भारतीय फलंदाजांनी 49 पेक्षा अधिक धावांची भागिदारी केलेली नव्हती. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी संघाला बॅकफूटवर ढकलले असताना नवोदित शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) आणि वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) यांनी आक्रमक फलंदाजी करत सातव्या विकेटसाठी चहापानापर्यंत विक्रमी 67 धावांची भागिदारी रचली. यासह दोघांनी 30 वर्ष जुना रेकॉर्ड मोडीत काढला आणि ऐतिहासिक भागीदारीची नोंद केली. ब्रिस्बेन (Brisbane) येथे भारताकडून सातव्या विकेटसाठी सर्वाधिक भागीदारीची नोंद आता या दोन खेळाडूंच्या नावावर झाली आहे. यापूर्वी माजी वर्ल्ड कप विजेता कर्णधार कपिल देव (Kapil Dev) आणि मनोज प्रभाकर (Manoj Prabhakar) यांनी सातव्या विकेटसाठी 1991 मध्ये सर्वाधिक 58 धावांची भागीदारी केली होती. या दोन दिग्गज फलंदाजांच्या जोडीला मागे टाकत पदार्पणवीर सुंदर आणि शार्दूलने ऐतिहासिक भागीदारी केली. माजी कर्णधार एमएस धोनी आणि रविचंद्रन अश्विनच्या जोडीने 2014 मध्ये या मैदानावर एकत्र 57 धावा काढल्या होत्या. (IND vs AUS 4th Test 2021: वॉशिंग्टन सुंदर-शार्दुल ठाकूरचा संघर्ष जारी, Tea ब्रेकपर्यंत भारताच्या 6 बाद 253 धावा)
पदार्पणवीर सुंदर आणि शार्दुल ठाकूर पहिल्यांदा खेळाच्या प्रदीर्घ स्वरूपात फलंदाजी करत आहेत. दुसर्या सत्राच्या सुरुवातीला 186 धावांवर 6 बाद आणि महत्वाच्या विकेट गमावल्यानंतर भारतीय संघ अडचणीत सापडला होता. तथापि, त्वरित अडचणीतून भारतीय डाव खेचण्यासाठी सुंदरने संयमी खेळ केला, तर शार्दुल ठाकूरने सुंदरसह गियर बदलण्यापूर्वी एक आक्रमक पवित्र घेतला. संपूर्ण भागीदारीत सुंदरने चांगले क्रिकेटींग शॉट्सदेखील खेळले. शार्दूल आणि सुंदरच्या भागीदारीच्या जोरावर टीम इंडियाने तिसऱ्या दिवसाच्या खेळात चहापानापर्यंत 6 विकेट्स गमावून 253 धावा केल्या असून ते अजूनही 116 धावांनी पिछाडीवर आहेत.
लक्षात घेण्यासारखे म्हणजे शार्दूलला ब्रिस्बेन टेस्टच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू सुंदरला रविचंद्रन अश्विनच्या जागी संधी मिळाली आहे. पहिल्या डावात अनुभवी खेळाडू फेल झाल्यावर या दोन्ही नवोदित खेळाडूंनी आक्रमक फलंदाजी करत संघाची धावसंख्या तीनशेच्या जवळ पोहचवली आहे.