
IND vs AUS 2nd Test Match 2020-21: मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (MCG) भारत (India)-ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात सुरु असलेल्या दुसर्या बॉक्सिंग डे टेस्ट सामन्याच्या दुसर्या दिवशी पहिल्या डावात टीम इंडियाने पाच गडी गमावून 277 धावा केल्या आहेत. संघासाठी कर्णधार अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) शानदार फलंदाजी करत आपल्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीचे 12वे कसोटी शतक ठोकले. रहाणे सध्या 200 चेंडूंमध्ये 12 चौकारांच्या मदतीने नाबाद 104 धावा करून खेळत आहे. शिवाय, स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) 104 चेंडूंत एका चौकारच्या मदतीने नाबाद 40 धावा करून मैदानात त्याला साथ देत आहे. रहाणे आणि जडेजाने सहाव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत संघाला दुसऱ्या दिवसाखेर 82 धावांची मोठी आघाडी मिळवून दिली. मेलबर्न कसोटी सामन्याच्या दुसर्या दिवशी काही मोठ्या रेकॉर्डस्ची नोंद झाली आहे जे खालीलप्रमाणे आहेत:
1. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने आज रिषभ पंतला बाद करत कसोटी क्रिकेटमधील 250 विकेट पूर्ण केल्या.
2. याशिवाय, कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत स्टार्कने कॅरेबियाचे माजी गोलंदाज माइकल होल्डिंग यांना मागे सोडले आहे. होल्डिंग यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 249 विकेट, तर स्टार्कच्या नावावर आता 250 विकेटवर झाले आहेत.
3. याशिवाय, स्टार्क सर्वात कमी चेंडूत 250 विकेट घेणारा ऑस्ट्रेलियाचा पहिला खेळाडू ठरला. कसोटी क्रिकेटमध्ये स्टार्कने हा टप्पा गाठण्यासाठी 11976 चेंडू फेकले. स्टार्कच्या अगोदर मिचेल जॉन्सनने 12578 चेंडूत 250 विकेट पूर्ण करत विक्रमाची नोंद केली होती.
4. भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेने आज कसोटी क्रिकेट कारकीर्दीचे त्याचे 12 वे शतक झळकावले.
5. मेलबर्नमध्ये कर्णधार म्हणून शतक ठोकणारा रहाणे हा दुसरा भारतीय कर्णधार ठरला. रहाणेच्या आधी 1999 मध्ये माजी कर्णधार आणि फलंदाज सचिन तेंडुलकरने संघाचे नेतृत्व करत 116 धावा केल्या होत्या.
6. कसोटी क्रिकेटमध्ये भारताने सर्वाधिक धावा केल्याच्या संदर्भात रवींद्र जडेजाने युवराज सिंहला मागे टाकले आहे. जडेजाच्या नावावर सध्या 1909 धावा आहेत तर युवीने 1900 धावा केल्या आहेत.
7. ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर-कर्णधार टिम पेन 150 डिसमिसल्स मिळवणारा सर्वात जलद विकेटकीपर ठरला. पेनने 33 तर दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकने 34 मॅचमध्ये हा टप्पा गाठला होता.
8. रहाणे ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी शतक करणारा पाचवा भारतीय ठरला. मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि विराट कोहली यांनी यापूर्वी कांगारू देशात टेस्ट शतक ठोकले आहेत.
दरम्यान, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा यजमान कांगारू संघाच्या पहिल्या डावाच्या प्रत्युत्तरात टीम इंडियाने आतापर्यंत 82 धावांची आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात फक्त 195 धावांपर्यंतच मजल मारू शकला होता.