ICC WTC Combined Playing XI: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2019-2021 आपल्या अंतिम टप्प्यात, पहा ICC कसोटी वर्ल्ड कप स्पर्धेचा सर्वोत्तम संयुक्त प्लेइंग XI
आयसीसी WTC सर्वोत्तम संयुक्त प्लेइंग इलेव्हन (Photo Credit: PTI)

ICC WTC Combined Playing XI: कसोटी क्रिकेटची वर्ल्ड कप स्पर्धा, आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC World Test Championship) 2019-21 आता आपल्या अंतिम टप्प्यात येऊन पोहचली आहे. भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघात अवघ्या काही दिवसांनी इंग्लंडमध्ये विजेतेपदाचा सामना रंगणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने  (Team India) खेळलेल्या 17 पैकी 12 सामने जिंकून 72.2% अशा विजयी टक्केवारीच्या जोरावर गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले आहे. दुसरीकडे सात सामने जिंकून 70 च्या विजय टक्केवारीसह किवी संघाला दुसर्‍या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. दरम्यान, संपूर्ण स्पर्धेदरम्यान खेळाडूंकडून काही उत्कृष्ट कामगिरी पाहायला मिळाली आहे. अशास्थितीत आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2019-2021 चक्राच्या सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनमध्ये काही नामवंत खेळाडूंनी स्थान मिळवले आहे. (World Test Championship 2021: न्यूझीलंड गोलंदाजांना टीम इंडियाच्या ‘या’ नवख्या खेळाडूची धास्ती, किवी प्रशिक्षकाचे हे विधान आहे पुरावा)

1. रोहित शर्मा

भारताचा अनुभवी ओपनर रोहित शर्मा कसोटी सलामीवीर म्हणून मिळालेल्या संधीचा फायदा घेण्यास सक्षम ठरला आहे. ‘हिटमॅन’ने 11 कसोटी सामन्यांमध्ये 4 शतकांसह 64.37 च्या सरासरीने 1030 धावा केल्या. रोहित घरच्या परिस्थितीमध्ये सर्वोत्कृष्ट ठरला तरी त्याला परदेशातील आव्हानात्मक परिस्थितीत त्याला फारसा प्रभाव पाडता आलेला नाही.

2. दिमुथ करुणारत्ने

श्रीलंकेचा सलामीवीर फलंदाज दिमुथ करुणारत्ने हा संघाचा दुसरा सलामीवीर आहे. करुणरत्नेने सातत्याने कामगिरी करत संघाचा प्रभावी फलंदाज ठरला आहे. त्याने 10 कसोटी सामन्यांमध्ये 55.50 च्या प्रभावी सरासरीने 999 धावा केल्या आहेत.

3. मार्नस लाबूशेन

ऑस्ट्रेलियाचा घातक फलंदाज लाबूशेन WTC मधील सर्वात यशस्वी फलंदाज ठरला आहे. त्याने 13 कसोटी सामन्यांमध्ये 72.82 च्या शानदार सरासरीने 1675 धावा केल्या आणि यामध्ये पाच शतकांचाही समावेश आहे. डब्ल्यूटीसी चक्रात ऑस्ट्रेलियासाठी लाबूशेन सातत्यपूर्ण कामगिरी करणारा ठरला.

4. स्टिव्ह स्मिथ

ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने पुन्हा एकदा हे सिद्ध केले की तो कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. डब्ल्यूटीसी चक्रात स्मिथ शानदार फॉर्ममध्ये असून त्याने सर्वत्र धावा लुटल्या. स्मिथने 13 कसोटी सामन्यांमध्ये चार शतकांच्या मदतीने 63.85 च्या प्रभावी सरासरीने 1341 धावा काढल्या.

5. बेन स्टोक्स

इंग्लंडचा बेन स्टोक्स वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू होता. अ‍ॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध हेडिंगले कसोटी सामन्यात इंग्लंडला जोरदार विजय मिळवून देण्यात स्टोक्सने डब्ल्यूटीसीचा उत्कृष्ट डाव खेळला. इंग्लंडच्या अष्टपैलू खेळाडूने 17 कसोटी सामन्यांमध्ये 1334 धावा केल्या तर डब्ल्यूटीसी चक्रात त्याने 34 विकेट्स काढल्या.

6. रिषभ पंत

भारताचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत आपल्या संघासाठी सर्वोत्कृष्ट ठरला. पंतने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन कसोटी सामन्यांमध्ये 274 धावा केल्या आणि भारताच्या डाऊन अंडर अंतर्गत संघाच्या मालिका विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. एकूणच डब्ल्यूटीसी सायकलमध्ये त्याने भारतासाठी 11 कसोटी सामन्यांमध्ये 41.37 च्या सरासरीने 662 धावा केल्या.

7. रवींद्र जडेजा

भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजाने शेवटच्या दोन मोसमात फलंदाजीत निश्चितच सुधारणा केली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वातल संघासाठी जडेजा बॅट आणि बॉलने विरोधी संघावर प्रभाव पाडण्यात यशस्वी ठरला आहे. अष्टपैलू खेळाडूने 58.62 च्या सरासरीने 469 धावा केल्या आणि 28.67 च्या सरासरीने 28 विकेट्स घेतल्या.

8. रविचंद्रन अश्विन

रविचंद्रन अश्विन देखील सर्व परिस्थितीत भारतीय संघाचा आणखी एक प्रभावी खेळाडू आहे. हनुमा विहारीसमवेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी कसोटी सामना अनिर्णित करण्यात अश्विनने महत्वाची भूमिका बजावली. 13 सामन्यांत 20.88 च्या प्रभावी सरासरीने 67 विकेट्स घेत ऑफस्पिनर डब्ल्यूटीसी सायकलचा तिसरा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. शिवाय, न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामन्यात चार विकेट घेतल्यास तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरू शकतो.

9. पॅट कमिन्स

जागतिक क्रमवारीत नंबर-1 कसोटी गोलंदाज पॅट कमिन्सने डब्ल्यूटीसी चक्रादरम्यान उत्कृष्ट कामगिरी बजावली. कमिन्सने 21.02 च्या सरासरीने 70 विकेट्स घेतल्या ज्या अंतिम सामन्यापूर्वी डब्ल्यूटीसी चक्रातील सर्वाधिक आहेत.

10. स्टुअर्ट ब्रॉड

इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने आपल्या अनुभवाचा चांगला उपयोग करत आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केली. ब्रॉड इंग्लिश परिस्थितीत सर्वोत्कृष्ट होता आणि त्याने खेळपट्टीवरचा पुरेपूर फायदा करून घेतला. ब्रॉडने 17 कसोटी सामन्यांमध्ये 20.08 च्या उदात्त सरासरीने 69 विकेट्स घेतल्या.

11. टिम साउदी

न्यूझीलंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साउदीने आपल्या संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यात नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. वेगवान गोलंदाजाने पैसा-वसूल बॉलिंग करत न्यूझीलंड परिस्थितीत सर्वोत्तम ठरला. साउदीने 10 कसोटी सामन्यांमध्ये 20.66 च्या प्रभावी सरासरीने 51 विकेट्स काढल्या.