World Test Championship 2021: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) फायनल सामन्यात संघाचा भारताचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याच्यापासून धोका असल्याचे न्यूझीलंड संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक शेन जुर्गेन्सन (Shane Jurgensen) यांनी म्हटले आहे. WTC चा फायनल सामना भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात 18 जूनपासून साऊथॅम्प्टन येथे खेळला जाणार आहे. जुर्गेन्सनने द टेलीग्राफला सांगितले की, “पंत हा एक धोकादायक खेळाडू आहे जो स्वबळावर सामना बदलू शकतो. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध त्याने कशी कामगिरी केली ते आपण पाहिले आहे. पंत खूप सकारात्मक मनाचा आहे.” पंतने ऑस्ट्रेलियाविरुद्ध डाऊन अंडर कसोटी मालिकेत चांगली कामगिरी केली होती आणि भारताच्या विजयाचा नायक ठरला होता. पंतने यावर्षी सहा कसोटीत 64.37 च्या सरासरीने 515 धावा केल्या आहेत. (ICC WTC Final: भारतीय मूळचा ‘हा’ 20 वर्षीय युवा पठ्ठा किवी संघाच्या ताफ्यात, नावात राहुल द्रविड-सचिन तेंडुलकरचे आहे अनोखे मिश्रण)
जुर्गेन्सन म्हणाले की, “आमच्या गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल आणि संयम ठेवून पंतला धाव घेण्यापासून रोखले जाईल याची खात्री करावी. पंतला रोखणे सोपे नाही आणि हे लक्षात ठेवले पाहिजे. भारताचा गोलंदाजीचा हल्ला आमच्यासाठी एक आव्हान आहे. त्यांच्याकडे या विभागात अनेक पर्याय आहेत. आम्हाला जसप्रीत बुमराह ते शार्दुल ठाकूर पर्यंत गोलंदाजांचा सामना कार्याचा आहे. त्यानंतर मोहम्मद सिराज आणि त्याचा फिरकीपटू आहे. भारताकडे उत्कृष्ट कसोटी गोलंदाज आहेत.” पंतने मागील दौर्यावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेन कसोटी सामना 328 धावांचे मोठे लक्ष्य साध्य करून संघाला डाऊन अंडर सलग दुसरी कसोटी मालिका जिंकून दिली होती. या ऐतिहासिक विजयात पंतने दुसर्या डावात सामन्याच्या शेवटच्या दिवशी 138 चेंडूंत नाबाद 89 धावा फटकावून संघाला विजय मिळवून दिला होता.
18 ते 22 जून दरम्यान होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यासाठी टीम इंडिया 2 जून रोजी एका चार्टर्ड विमानाद्वारे इंग्लंडला रवाना होणार आहे. यानंतर साउथॅम्प्टनला पोहचल्यावर संघ पुन्हा 10 दिवस क्वारंटाईन होईल मात्र तीन दिवस आयसोलेशनमध्ये राहिल्यावर त्यांना सरावाची मुभा दिली जाईल. दुसरीकडे, किवी संघ WTC फायनल सामन्यापूर्वी इंग्लंड विरोधात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.