भारतीय (India) क्रिकेटपटू मनोज तिवारीची (Manoj Tiwary) पत्नी सुष्मिता रॉय (Sushmita Roy) तिच्या क्रिकेटर नवऱ्याच्या नावावरील एक सोशल मीडिया पोस्ट पाहून थक्क झाली आहे. सोशल मीडियावर स्क्रीन शॉट्स शेअर करुन तिने आपला संताप व्यक्त केला आहे. मनोजवर इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे, ज्यात भारताच्या फ्लॉप क्रिकेटपटू (Flop Cricketers) ठरलेल्या 11 खेळाडूंची नावे आहेत. या पोस्टमध्ये तिचा नवरा मनोजचे नाव पाहून सुष्मिता खूप चिडली होती आणि पोस्ट शेअर करून अशा प्रोफाइल तयार करणाऱ्यांवर संताप व्यक्त केला. मनोज तिवारी भारतीय घरगुती क्रिकेटमध्ये बंगाल संघाचा नायक ठरला आहे. त्याने आपल्या आजवरच्या कारकीर्दीत सुमारे 33 शतके आणि 92 अर्धशतकांच्या सहाय्याने सुमारे 18,000 धावा केल्या आहेत. परंतु, त्याच्या काळातला सर्वात हुशार फलंदाज असूनही टीम इंडियासाठीची त्यांची कारकीर्द कधीच सुरु होऊ शकली नाही. 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध ब्रिस्बेनमधील गाब्बा येथे त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण केले होते.त्यानंतर तिवारी 12 वनडे सामने खेळला ज्यात त्याने 26.09 च्या सरासरीने 287 धावा केल्या. वयाच्या 34 व्या वर्षी तिवारी पुन्हा टीम इंडियाकडून खेळण्याची शक्यता कमी आहे, पण तो बंगालकडून रणजी सामने खेळत आहे.
सुष्मिताने ती पोस्ट शेअर केली आणि लिहिले की, "अशी अयोग्य प्रोफाइल कोणी तयार केली, तुमची हिम्मत कशी झाली माझ्या नवऱ्याचे नाव त्यात ओढण्याची, अशी बकवास पोस्ट शेअर करण्यापूर्वी तुम्ही तुमची वस्तुस्थिती तपासावी." येथे पाहा ती पोस्ट:
सुष्मिताच्या या पोस्टनंतर अनेक चाहतेही त्यांच्या समर्थनार्थ आले आहेत. तिवारीने आतापर्यंत भारतासाठी 12 वनडे आणि 3 टी-20 सामने खेळले आहेत. तिवारीने वनडेमध्ये एक शतक आणि एक अर्धशतक ठोकले आहेत. तिवारी अशा दुर्दैवी क्रिकेटपटूंपैकी एक आहे ज्यांच्याना प्रतिभा असूनही जास्त संधी मिळाल्या नाहीत. महत्त्वाचे म्हणजे काही दिवसांपूर्वी केकेआरच्या ट्विटवरून तिवारी निराश झाला होता, ज्यात त्यांनी 27 मे 2012 रोजी केकेआरची टीम प्रथम आयपीएल विजेतेपद जिंकण्यात यशस्वी झाल्याचे नमूद केले होते.