
महिला क्रिकेट विश्वात फलंदाजी आणि विकेटकीपिंगमध्ये आपला प्रभाव पडणाऱ्या दिग्गज इंग्लिश (England) खेळाडू सारा टेलर (Sarah Taylor) ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. साराने वयाच्या 30 व्या वर्षी निवृत्तीची घोषणा केली. सारा टेलरने 2006 मध्ये इंग्लंडसाठी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. साराने तिच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत एकूण 6553 धावा केल्या आहेत, जे इंग्लंडमधील महिला क्रिकेटमधील दुसर्या सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. याशिवाय साराने तिच्या कारकीर्दीत विकेटकीपर म्हणून 232 विकेट्स टिपल्या आहेत. साराने इंग्लंडच्या महिला क्रिकेटसह 13 वर्षे दीर्घ काळ घालवला आहे. निवृत्तीची घोषणा करताना सारा टेलर म्हणाली की, 'हा निर्णय घेणे अवघड होते, परंतु निवृत्ती घेण्याची ही योग्य वेळ आहे.'
सारा टेलर काही काळ मानसिक चिंतेसह झगडत होती. अशा परिस्थितीत साराने तिच्या तब्येतीकडे पाहता निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी साराने न्यूड फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. साराने महिलांच्या आरोग्याबद्दल जनजागृतीसाठी हा फोटो काढला असून त्यासोबत महत्वाचा संदेशदेखील दिला आहे. आणि यासाठी तिचे कौतुकही झाले होते.
साराने इंग्लंडकडून 10 टेस्ट,126 वनडे आणि 90 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. शिवाय, जगातील सर्वोत्कृष्ट विकेटकीपर-फलंदाजांमध्ये तिचा समावेश केला जातो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये साराने एकूण सात शतके आणि 36 अर्धशतक केली आहेत.याशिवाय वेगवान विकेटकीपिंगसाठीही तिची आठवण केली जाईल. साराच्या विकेटकीपिंगची तुलना टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर फलंदाज महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्याशीही केली गेली आहे.