ENG vs PAK ODI 2021: विराट कोहलीचा 8 वर्ष जुना विक्रम धोक्यात, पाकिस्तानच्या या धुरंधर फलंदाजाला सुवर्ण संधी पण समोर इंग्लंडचे चुरशीचे आव्हान
जोस बटलर आणि विराट कोहली (Photo Credit: PTI)

ENG vs PAK ODI 2021: श्रीलंकेचा (Sri Lanka) टी-20 आणि वनडे मालिकेत सफाया केल्यावर यजमान इंग्लंड संघ (England Cricket Team) आता पाकिस्तान (Pakistan) टीमचा पाहुणचार करण्यासाठी सज्ज आहे. 8 जुलैपासून दोन्ही संघात तीन सामन्यांची वनडे मालिका रंगणार असून पहिला सामना कार्डिफ येथे खेळला जाणार आहे. आयसीसी वर्ल्ड कप सुपर लीग अंतर्गत ही मालिका खेळवण्यात येणार असून यजमान ब्रिटिश संघ पहिल्या स्थानावर आहे तर पाकिस्तान तिसर्‍या क्रमांकावर आहे. बाबर आजम (Babar Azam) पाकिस्तान संघाचे नेतृत्वात करेल. बाबरने आतापर्यंत 80 एकदिवसीय सामन्यांच्या 78 डावांमध्ये 3808 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 13 शतके आणि 17 अर्धशतके झळकावली आहेत. आणि आता या मालिकेत 26 वर्षीय बाबरकडे आंतरराष्ट्रीय वनडेमध्ये सर्वात जलद 4000 धावांचा पल्ला गाठण्याची सुवर्ण संधी आहे. (ENG vs PAK ODI 2021: पाकिस्तानविरुद्ध मालिकेसाठी 16 सदस्यीय ब्रिटिश संघ जाहीर, या खेळाडूंना मिळाले स्थान)

आजमने गेल्या वर्षात पाकिस्तान संघासाठी उल्लेखनीय कामगिरी करत पाकिस्तान संघाला विजय मिळवून देण्यात अनेकदा महत्वाची भूमिका बजावली आहे. यादरम्यान इंग्लंड दौऱ्यावर तो लवकरच दिग्गज फलंदाज विराट कोहलीचा (Virat Kohli) विक्रम मोडण्याची शक्यता आहे आणि यासाठी त्याला 192 धावांची गरज आहे. पण बाबरसाठी हे सर्व सोप्पे ठरणार नाही कारण ब्रिटिश संघ नुकतंच श्रीलंकेविरुद्ध मालिका विजयासह मैदानात उतरणार आहे. तसेच त्यांना घरच्या परिस्थितीत खेळण्याचाही फायदा मिळेल. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात चार हजार धावा करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलाच्या (Hashim Amla) नावावर आहे. आमलाने 81 डावात हा कारनामा केला होता. तथापि या यादीत आशियाई खेळाडू भारतीय कर्णधार विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. विराटने 93 वनडे डावात 4000 धावांचा पल्ला गाठला होता. अशास्थितीत आता बाबरकडे कोहलीचा हा रेकॉर्ड मोडण्याची सुवर्ण संधी आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने 2013 रांची एकदिवसीय सामन्यात इंग्लंडविरुद्ध हा पराक्रम केला होता. विराटने रांची वनडेमध्ये नाबाद 77 धावांची खेळी केली.

इंग्लंड दौऱ्यावरील मालिकेबद्दल बोलायचे तर दोन्ही संघातील तीन सामन्यांपैकी पहिला वनडे सामना कार्डिफमध्ये तर दुसरा सामना 10 जुलै रोजी लंडनमध्ये होईल. मालिकेचा तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना 13 जुलै रोजी बर्मिंघम येथे खेळला जाईल. या दौऱ्यापूर्वी अलीकडेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) बाबरला युवा वेगवान गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी आणि हसन अली, मोहम्मद रिझवान यांना राष्ट्रीय कराराच्या पहिल्या अ गटात स्थान दिले होते.