न्यूझीलंड विरुद्ध विश्वचषक फायनलमध्ये बेन स्टोक्स ला दिलेल्या ओवरथ्रो विवादावर जेम्स अँडरसन चा मोठा खुलासा
बेन स्टोक्स (Photo Credit: ICC/Twitter)

इंग्लंड (England) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघातील आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषक सामना जितका रंगतदार होता तितकाच विवादास्पद देखील होता. साखळी संन्यासारखे फायनलमध्ये देखील अंपायरांनी आपल्या चुकांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. इंग्लंडला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमधील 3 चेंडूत 9 धावांची गरज होती. बेन स्टोक्स (Ben Stokes) ने मारलेला चेंडू सीमारेषेवर गेला. चेंडू सीमारेषेवर अडवेपर्यंत स्टोक्स दुसरी धाव घेण्यासाठी निघाला होता आणि धाव पूर्ण करण्यासाठी त्याने झेप घेतली. पण त्याच वेळी सीमारेषेवरून मार्टिन गप्टिल (Martin Guptill) याने फेकलेला चेंडू स्टोक्सच्या बॅटला लागून थेट सीमारेषेपार गेला. त्यामुळे इंग्लंडला 4 अतिरिक्त धावा मिळाल्या ज्याच्यामुळे संपूर्ण सामन्याचा परिणाम दुसराच लागला. या प्रसंगासाठी स्टोक्सने नंतर न्यूझीलंड कर्णधार केन विलियमसन याची माफी देखील मागितली. आता काही दिवस उलटून गेले असता स्टोक्सचा सहकारी जेम्स अँडरसन (James Anderson) याने ओव्हर थ्रोच्या वादावर मोठा खुलासा केला आहे. (आज होतेय कोट्यवधी रुपयांची उलाढाल, त्यावेळी इतक्या मानधनात खेळी होती विश्वचषक विजेता कपिल देवची टीम इंडिया)

बीबीसी (BBC) ला दिलेल्या एका मुलाखतीत अँडरसन म्हणाला,"अंपायरांनी जेव्हा ओव्हर थ्रोवर चौकार दिला तेव्हा स्टोक्सने त्यांना तो मागे घ्या असं सांगितलं. थ्रो केल्यावर जर चेंडू आपल्याला लागल्यास त्यावर धाव घेणं खिलाडूवृत्तीत बसत नाही. पण जेव्हा चेंडू लागून तो सीमारेषेबाहेर गेल्यास नियमानुसार धावा मिळतात. त्यावेळी तुम्ही काही करू शकत नाही."

दरम्यान, ओव्हर थ्रोसाठी आयसीसीचा नियमानुसार जर फील्डिंग करणाऱ्या खेळाडूमुळे जर चेंडू सीमापार गेला तर, त्याचा फायदा दुसऱ्या संघाला होतो. पण जर, फलंदाजाने थ्रो करण्याआधी धाव पूर्ण केली नसेल तर, एक अतिरिक्त धाव फलंदाजाला मिळत नाही. आणि म्हणून जेव्हा गप्टिलने थ्रो केला तेव्हा स्टोक्स क्रिजमध्ये नव्हता. त्यामुले त्याला दोन रन ऐवजी केवळ एक धाव देणे गरजेचे होते. अंपायरच्या या एका चूकीमुळे विश्वचषक न्यूझीलंडच्या हातून निसटला.