
अनेक खेळाडूंच्या दुखापतीमुळे भारतीय क्रिकेट बोर्ड (बीसीसीआय) आजकाल कदाचित अस्वस्थ आहे. न्यूझीलंडच्या (New Zealand) महत्त्वपूर्ण दौर्यापूर्वी शिखर धवन आणि इशांत शर्मा जखमी झाले. शिवाय नुकतंच भूवनेश्वर कुमारच्या हर्नियाचे ऑपरेशन केले गेले होते. या महत्त्वाच्या खेळाडूंच्या दुखापतीमुळे बीसीसीआय (BCCI) नक्कीच अस्वस्थ झाला आहे आणि यामुळे बोर्डाने कसोटी विकेटकीपर-फलंदाज रिद्धिमान साहा (Wriddhiman Saha) ला रणजी (Rnaji Trophy) सामन्यात खेळण्यास नकार दिला. साहाच्या बोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि आता तो दुखापतीतून बरे झाला आहे. त्याला बंगालकडून होणाऱ्या रणजी सामन्यात भाग घ्यायचा होता, पण साहासंदर्भात मंडळाला कोणताही धोका पत्करण्याची इच्छा नाही. नोव्हेंबरमध्ये भारत (India) आणि बांग्लादेश दरम्यान कोलकातामध्ये झालेल्या डे-नाईट टेस्ट सामन्यादरम्यान 35 वर्षीय विकेटकीपरच्या उजव्या हातात फ्रॅक्चर झाले होते. (न्यूझीलंड दौऱ्याच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; पृथ्वी शॉ, संजू सॅमसन यांना संधी)
बंगालचे प्रशिक्षक अरुण लाल यांनी हैदराबादविरुद्ध डाव आणि 303 धावांनी विजय मिळविल्यानंतर सांगितले की, दिल्लीविरुद्ध रविवारीपासून ईडन गार्डन्सवर सामन्यासाठी साहा उपलब्ध होणार नाही. बोर्डाने त्यांना खेळण्यास मनाई केले असल्याचे त्यांनी म्हटले. साहा सध्या पुनर्वसनासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) आहेत. न्यूझीलंडविरुद्ध टेस्ट मालिका 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
शिवाय, बंगालचा कर्णधार अभिमन्यु ईस्वरन आणि वेगवान गोलंदाज ईशान पोरेल हे न्यूझीलंडच्या भारत अ संघासह दौर्यावर असल्याने संघाला त्यांची कमतरता जाणवेल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेदरम्यान रिषभ पंत देखील जखमी झाला होता, मात्र न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी त्याला टीम इंडियात समावेश करण्यात आले आहे. दरम्यान, मंगळवार रात्री बोर्डाने न्यूझीलंडविरुद्ध टी-20 आणि वनडे मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. यामध्ये जखमी धवनच्या जागी पृथ्वी शॉ याचा समावेश करण्यात आला आहे. टेस्टमध्ये चमकदार पदार्पण करणाऱ्या पृथ्वीला रविवारी न्यूझीलंड इलेव्हनविरुद्ध 150 धावांच्या तुफानी खेळीमुळे वनडे संघात स्थान देण्यात आले. अष्टपैलू म्हणून शिवम दुबेवर संघाने विश्वास दाखविला आहे, तर रवींद्र जडेजाचा फिरकी अष्टपैलू म्हणून संघात समावेश झाला आहे. वेगवान गोलंदाजीची जबाबदारी जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात मुहम्मद शमी, नवदीप सैनी, शिवम दुबे आणि शार्दुल ठाकूर यांच्याकडे असेल तर कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांच्यासह जाडेजा स्पिन विभाग सांभाळतील.