
ऑस्ट्रेलिया (Australia) आणि इंग्लंड (England) यांच्यातील अॅशेस मालिका (Ashes Series0 सुरू झाली आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना ब्रिस्बेनमधील (Brisbane) गब्बा येथे खेळला जात आहे. यजमान ऑस्ट्रेलियाने या सामन्यात शानदार सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नरने (David Warner) अॅशेस मालिकेत दमदार सुरुवात केली आणि पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात 94 धावांची दमदार खेळी करून बाद झाला. वॉर्नरचे कसोटी कारकिर्दीतील 25 वे शतक हुकले. पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात वॉर्नर खूप नशीबवान ठरला होता. तो 17 धावा करून इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. पण थर्ड अंपायरने चेंडू नो-बॉल असल्याचं सांगितलं. उल्लेखनीय आहे की वॉर्नर नो-बॉलवर बाद होण्याची ही पाचवी वेळ होती. यासह स्टार ऑस्ट्रेलियन ओपनरने एका विशेष विक्रम आपल्या नावे केला आहे. (Ashes 2021-22: अरेरे! हसीब हमीद आणि डेविड वॉर्नर यांची अशी चूक पाहून माराल कपाळावर हात)
2014 साली वॉर्नर टीम इंडियाविरुद्ध नो-बॉलवर बाद झाला होता. यानंतर त्याने 145 धावांची वेगवान खेळी खेळली. त्यानंतर 2016 मध्ये दुसऱ्यांदा वॉर्नरला पाकिस्तानविरुद्ध जीवनदान मिळाले. त्यानंतर 2017 मध्ये तो इंग्लंडविरुद्ध 99 धावांवर नो-बॉलवर बाद झाला होता. यानंतर 2019 मध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानविरुद्ध 56 धावांवर जीवदान मिळाले. या सामन्यात वॉर्नरने 154 धावा केल्या. वॉर्नरने आजच्या सामन्यात लाइफलाइन मिळाल्यानंतर 94 धावा केल्या. विशेष म्हणजे इंग्लंडविरुद्ध सध्या सुरु असलेल्या अॅशेस सामन्यात वॉर्नरचा इंग्लिश अष्टपैलू बेन स्टोक्सने त्रिफळा उडवला होता. स्टोक्सने आतापर्यंत कांगारू संघाच्या पहिल्या डावात 14 वेळा नो-बॉल टाकले आहेत, पण पंचांनी फक्त दोन वेळा त्याला टोकले आहे. यावरून चाहतेच नाही तर तज्ञांनी देखील थर्ड अंपायरला खडेबोल सुनावले आहे. वॉर्नरने 94 धावांची दमदार खेळी करत संघाला मजबूत स्थितीत पोहचवले. तत्पूर्वी, जो रूटचा ब्रिटिश संघ पहिल्या डावात अवघ्या 147 धावांत गारद झाला होता.
दरम्यान दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने सात विकेट गमावून 343 धावा केल्या आहेत. इंग्लंडने पहिल्या डावात 147 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात यजमान ऑस्ट्रेलियाने 196 धावांची आघाडी घेतली आहे.