
अनेक तरुण टिक टॉक अॅपवर (Tiktok) प्रसिद्धी मिळवण्यासाठी जीवाची पर्वा न करता व्हिडिओ बनवतात. या दुर्घटनांमध्ये व्हिडिओ बनवताना अनेकांचा मृत्यूही झाला आहे. तुम्ही सोशल मीडियावर अशा अनेक घटनांचे व्हिडिओ पाहिले असतील. तसेच कित्येकवेळा खोल दरीच्या कडेला उभं राहून सेल्फी काढून मृत्यू झाल्याच्या घटनाही ऐकल्या असतील.
बर्फ पडलेल्या नदीत टिकटॉक व्हिडिओ बनवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा थोडक्यात जीव वाचला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या तरुणाचे नाव जॅसन क्लार्क, असं आहे. या तरुणाचे टिक टॉक अॅपवर 4 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. लोकांचे लक्ष वेधून घेण्याच्या नादात क्लार्कने आपला जीव धोक्यात घातला आहे. (हेही वाचा - स्वातंत्र्यवीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे यांचे व्यंगचित्र काढून भाजपची शिवसेनेवर खोचक टीका)
जॅसन क्लार्क बर्फ पडलेल्या एका नदीत टिकटॉक व्हिडिओ करण्यासाठी गेला. मात्र, येथे तो बर्फाच्या चादरीखाली अडकला. त्यानंतर तो नदीतून बाहेर पडण्यासाठी वाट शोधू लागला. परंतु, त्याला बर्फाच्छादित नदीतून वाट सापडेना. अखेर काही वेळानंतर त्याला जेथून तो नदीत गेला होता, ती वाट सापडली. त्यानंतर तो या वाटेतून नदीबाहेर आला. क्लार्क आणखी काही वेळ त्या बर्फाच्छादित पाण्यात राहिला असता तर मोठा अनर्थ घडला असता.
दरम्यान, या सर्व प्रकारावर जॅसन क्लार्कने आपल्या टिक टॉक अॅपवरील व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. यात त्याने म्हटलं आहे की, 'मी नदीतील बर्फाखाली अडकलो होतो. त्यानंतर बराच वेळ मला बाहेर पडण्याचा रस्ता सापडत नव्हता. तेव्हा मला मी जगेल याची शाश्वती नव्हती,' असं म्हटलयं. जॅसन क्लार्कने शेअर केलेला हा व्हिडिओ अनेकांनी पाहिला आहे. तसेच सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.