Fact Check: राजस्थानमधील पिपलेश्वर महादेव मंदिरात दररोज रात्री चित्त्याचा परिवार पुजाऱ्यासोबत झोपतो? जाणून घ्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या जुन्या व्हिडिओमागील सत्य
Man Sleeping With Cheetah (Photo Credits Video Screengrab/ @RKGoel09435594/ Twitter)

Fact Check: सध्या सोशल मीडियावर एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक माणूस चित्त्यासोबत (Cheetahs) झोपलेला दिसत आहे. हा व्हिडिओ राजस्थानमधील पिंपळेश्वर महादेव मंदिरातील (Pipleshwar Mahadev Temple) असल्याचं म्हटलं जात आहे. चित्त्याचे संपूर्ण कुटुंब या मंदिरातील पुजाऱ्यासोबत रात्री झोपण्यासाठी येते, असा दावा या व्हिडिओ क्लिपद्वारे करण्यात येत आहे.

या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीशेजारी दोन ते तीन चित्ते झोपलेले पाहायला मिळत आहे. ही व्यक्ती एका चित्याला कुशीत घेऊन झोपलेलीदेखील पाहायला मिळत आहे. व्हायरल होत असलेल्या दाव्यानुसार, हा व्हिडिओ राजस्थानमधील मोचळ येथील हिंदू मंदिर पिंपलेश्वर महादेव येथील आहे. सोशल मीडिया वापरकर्त्यांचा असा दावा आहे की, व्हायरल व्हिडीओमधील हा माणूस या मंदिराचा पुजारी आहे. दररोज रात्री चित्त्याचा परिवार या पुजाऱ्यासोबत झोपतो, असंही या व्हायरल होत असलेल्या दाव्यांमध्ये म्हटलं आहे. (वाचा - Fish Eating Another Larger Fish-Fact Check: माशाने गिळला मासा, पाहा कसा? जबरदस्त व्हिडिओ, जाणून घ्या वास्तव)

राजस्थानमध्ये सिरोही नावाचे एक गाव आहे. या गावात पिंपलेश्वर महादेवाचे मंदिर आहे. या मंदिरात चित्त्याचे कुटुंब रात्री पुजार्‍याजवळ झोपते, हे समजताचं शासकीय वन्यजीव विभागाने तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. दरम्यान, हा व्हिडिओ खरा असला तरी तो राजस्थानचा नाही. व्हिडिओमधील व्यक्ती पुजारी नसून दक्षिण आफ्रिकेतील वन्यजीवांसाठी काम करणारी व्यक्ती आहे. त्यांचं नाव डॉल्फ सी व्होकर (Dolph C Volker) आहे. त्यांनी 2015 मध्ये आपल्या यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडिओ शेअर केला होता.

व्हायरल व्हिडिओ - 

Original Video - 

व्हिडिओच्या खाली डॉल्फने सांगितले आहे की, चित्तासह झोपणे हा त्यांचा एक प्रयोग होता. वास्तविक, त्यांना चित्तांशी संबंधित असलेल्या आवडी-निवडीविषयी जाणून घ्यायचे होते. या प्रयोगासाठी त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील चित्ता प्रजनन केंद्राकडून विशेष परवानगी घेतली होती. त्यामुळे सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ राजस्थानमधील पिंपलेश्वर महादेव मंदिरातील असल्याचा सध्याचा दावा खोटा आहे.