सध्या भारतासह जगभरात कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीने हाहाकार माजवला आहे. अनेक देशांमध्ये कोरोना विषाणू दुसरी लाट चालू आहे. भारतामध्ये विषाणूविरुद्ध लसीकरण चालू आहे मात्र देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत लसीचे दोन्ही डोस पोहोचवण्यासाठी अजून काही महिने लागतील. अशात सोशल मिडियावर कोरोनाबाबत अनेक बातम्या व्हायरल होत आहेत. आताही एक बातमी व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, कोरोनावरील उपचार म्हणून मध, आले आणि मिरपूडचा वापर केला जाऊ शकतो. पुडुचेरी विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याने हा उपाय शोधून काढल्याचे या मेसेजमध्ये म्हटले आहे.
महत्वाचे म्हणजे कोरोनावरील या मध, आले आणि मिरपूडयुक्त घरगुती उपचाराला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मान्यता दिली असल्याचेही यामध्ये नमूद केले आहे. सध्या हा मेसेज सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यानंतर आता प्रेस इन्फॉरमेशन ब्यूरो ऑफ इंडियाने (PIB) त्यांच्या फॅक्ट चेक हँडलवर हे दावे फेटाळून लावले आहेत. ही बातमी पूर्णतः खोटी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘ही बातमी बनावट असून, असे दिशाभूल करणारे संदेश शेअर करू नका. कोविड-19 बाबत केवळ योग्य अधिकृत स्रोतांवरच विश्वास ठेवा.’ असे पीआयबीने म्हटले आहे.
एक #फ़र्ज़ी खबर में दावा किया जा रहा है कि पांडिचेरी विश्वविद्यालय के एक छात्र ने #COVID19 का घरेलू उपचार ढूंढ लिया है व @WHO द्वारा भी इसे स्वीकृति दी गई है।
ऐसे भ्रामक संदेश साझा न करें। #कोविड19 से जुड़ी सही जानकारी हेतु आधिकारिक सूत्रों पर ही विश्वास करें। pic.twitter.com/Utepz7OYps
— PIB Fact Check (@PIBFactCheck) April 25, 2021
तसेच अशा कोणत्याही प्रकारच्या घरगुती उपायाला डब्ल्यूएचओने मंजुरी दिली नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे. याआधी आयुष मंत्रालयाने आयुर्वेदिक पद्धतींद्वारे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत. मात्र त्याद्वारे फक्त रोग प्रतिकारशक्ती वाढवली जाऊ शकते, त्याकडे कोरोनाचा उपाय म्हणून पहिले जाऊ शकत नाही. अशाप्रकारे, जागतिक आरोग्य संघटनेच्या नावाने बनावट बातम्या पसरविण्यात येत आहेत. कोरोना संसर्ग झाल्यास किंवा काही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आम्ही आवाहन करतो. (हेही वाचा: Fake News कशा ओळखाल? COVID-19 Pandemic मध्ये चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी 'या' गोष्टींची घ्या काळजी)
दरम्यान, याआधी कच्चा कांदा आणि सैंधव मीठ खाल्याने कोरोना संसर्ग बरा होतो, असा दावा करण्यात आला होता. मात्र यालाही कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचे पीआयबीने स्पष्ट केले आहे.