कोविड-19 संकटामुळे (COVID-19 Pandemic) जगातील बहुतांश देश लॉकडाऊनमध्ये अडकले आहेत. त्यामुळे या काळात सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर होत आहे. या कठीण परिस्थितीत जगात घडणाऱ्या सर्व घडामोडींचे अपडेट मिळवण्यासाठी आणि आपल्या सर्व नातेवाईक-मित्रमंडळींशी संवाद साधण्यासाठी सोशल मीडिया सर्वात मोठे साधन ठरत आहे. यासोबतच कोविड-19 संबंधित जागरुकता पसरवण्यासाठी सोशल मीडिया माध्यमं मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहेत. परंतु, या सोशल मीडियाचा गैरवापर फेक न्यूज पसरवण्यासाठी देखील केला जात आहे. अशा बातम्या कोरोना व्हायरस प्रमाणे अगदी जलद गतीने पसरत जातात. गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमुळे हॉस्पिटल्स बेड्स, कोविड-19 लस, ऑक्सिजन पुरवठा यांसारख्या आरोग्य सुविधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेत फेक न्यूज पसरवल्या जात आहेत. परंतु, फसवणूक होऊ नये म्हणून फेक न्यूज (Fake News) ओळखणे गरजेचे आहे.
फेक न्यूज म्हणजे काय?
बातमी म्हणून चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती सादर करणे याला 'फेक न्यूज' म्हणतात. अनेकदा या बातम्या एखाद्या व्यक्तीची प्रतिमा मलिन करणाऱ्या किंवा संस्थेच्या प्रतिष्ठेला हानी पोहचविण्याच्या उद्देशाने बनवलेल्या असतात. अशा बातम्या सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून शेअर केल्या जातात. बहुतांश वेळा लोक त्या बातमीचा मुख्य स्त्रोत तपासून पाहत नाहीत. त्यामुळे बातमी अचूक आहे की नाही, हे ठरवता येत नाही आणि अशा बातम्या अगदी सहज फॉरवर्ड केल्या जातात. कोविड-19 संकटात लोक चिंतेत आहेत. त्यात अशा बातम्या समोर आल्याने त्यांचा अधिकच गोंधळ उडतो. (Fact Check: कोविड-19 संबंधित मेसेज पोस्ट केल्यास दंडात्मक कारवाई होणार? PIB ने केला Viral WhatsApp Message चा खुलासा)
फेक न्यूज कशी ओळखाल?
# सोशल मीडियाद्वारे तुमच्या समोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेऊ नका. वाचल्यावर त्यावर विश्वास बसावा याप्रमाणे खोटी बातमी तयार केलेली असते.
# तुमच्याकडे आलेली बातमी इंटरनेटवर तपासून पहा. यासोबतच तुम्ही जी वेबसाईट पाहत आहात त्याची युआरएल (URL) देखील पडताळून पाहणे गरजेचे आहे. जर युआरएलच्या शेवटी '.com .com' किंवा '.lo.' असे लिहिले असेल तर ते वेबपेज खोटे असू शकते.
# खोटी माहिती पसरवण्यासाठी कित्येकदा लोक खोटे वेबपेज तयार करतात.
# एखाद्या बातमीच्या सोर्स तपासून पाहण्यासाठी त्या बातमीशी निगडीत असलेल्या संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. जर तुम्हाला World Health Organization संबंधित पोस्ट आढळल्यास WHO च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन त्याची पडताळणी करा.
# जर एखादी खरी बातमी तुमच्यासमोर आली असेल तर त्यामध्ये खूप सारे फॅक्ट्स असतील. सर्वे डेटा असू शकतो. त्यासोबतच प्रत्यक्षदर्शींबद्दलही माहिती असू शकते. परंतु, यापैकी काहीच न आढळल्यास ती बातमी खोटी असण्याची शक्यता आहे.
# खोट्या बातम्यांमध्ये स्पेलिंग-व्याकरणाच्या चुका असण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे त्या जरुर तपासाव्या. भडकाऊ, प्रक्षोभक असे आर्टिकल शक्यतो फेक असते.
कोरोना व्हायरस संकटात वेगाने पसरणाऱ्या फेक न्यूजला बळी न पडण्यासाठी या काही टिप्स नक्कीच फायदेशीर ठरतील. अन्यथा फेक न्यूजमुळे फसवणूक किंवा दिशाभूल होण्याची दाट शक्यता असते.