कोरोना संकटामुळे मागील वर्षभरापासून आपण सारेच लॉकडाऊन मध्ये आहोत. कोविड 19 चं संकट घोंघावत असताना बाहेर पडल्यास आपण कोरोनाबाधित होऊ या भीतीने अनेक जण शक्यतो घरामध्येच राहून काम करत आहे पण काही समाजकंटक या भीतीचा गैरफायदा घेत सोशल मीडीयामध्ये खोट्या बातम्या पसरवत आहे. यामधून आर्थिक फसवणूकीचे अनेक प्रकार समोर आले आहे. दरम्यान सध्या सोशल मीडीयामध्ये एक असा मेसेज वायरल होत आहे ज्यात दावा करण्यात आला आहे की कोरोना काळात ज्या महिला विधवा झाल्या आहेत त्यांना प्रतिवर्षी 50 हजार रूपयांची मदत मिळू शकते. कदाचित तुमच्याही नजरेत असा मेसेज आला असेल. पण या मेसेजमागील सत्य जाणून घेण्याचा लेटेस्टली मराठीने प्रयत्न केला आहे. आणि आमच्यासमोर आलेली गोष्ट पहा काय आहे.
महिला व बालकन्या योजनाजिजाऊ/जिजामाता ही योजना अश्या महिलांसाठी आहे ज्या महिला कोरोना काळात विधवा झाल्या आहेत(1 मार्च 2020 ते 28 फेब्रुवारी 2021) ह्या काळात ज्या घरातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाले आहे त्याच्या साठी ही योजना आहे. (वय वर्षे २१ ते ७० ही मर्यादा आहे)प्रति लाभार्थी ५०,००० रुपये वर्षाला मिळतील....
(अधिक माहिती साठी संपर्क)
७०१६१६९०४५
【पूजा रमेश पाटील】
[ उर्फ]
{पूजा आकाश ठक्कर}
ऑफिस टाईम मध्ये संपर्क करावा
【सकाळी १०:००सायं ६:००】
कृपया करून जास्तीत जास्त
लोकांपर्यंत पोहोचावा ही
कळकळीची विनंती आहे
दरम्यान अशाप्रकारचा मेसेज आमच्या समोर आला होता. या मेसेज मध्ये दिल्याप्रमाणे संबंधित व्यक्तीला फोन लावून संपर्क साधण्याचा आम्ही प्रयत्न केला पण आमच्या अपेक्षेप्रमाणेच घडलं. या मेसेज मध्ये दिलेला फोन नंबर हा स्विच्ड ऑफ असल्याचा प्रतिसाद आम्हांला मिळाला. सोबतच हा मेसेज मराठीमध्ये असला तरीही या क्रमांकावर कॉल केल्यानंतर मिळणारा प्रतिसाद अर्थात आयवीआर वरील मेसेज हा गुजराती भाषेत ऐकायला मिळतो. त्यामुळे अशाप्रकारे कोणतेही आर्थिक सहाय्य मिळत नसल्याचं समोर आलं आहे. Truecaller वर देखील हा नंबर स्पॅमच्या यादीमध्ये दाखवला जात आहे.
मागील वर्षभरापासून कोरोना संकटकाळात अफवा, खोट्या बातम्या, सनसनाटी निर्माण करणारे अनेक मेसेज वायरल होत आहेत. त्यामधीलच हा एक मेसेज असावा. दरम्यान महाराष्ट्र सरकार किंवा केंद्र सरकार कडून अद्यापही अशाप्रकारची कोणतीही योजना सुरू झालेली नाही. त्यामुळे तुम्हांला असा मेसेज आला असल्यास त्याकडे दुर्लक्ष करा. Fact Check: प्रधानमंत्री क्रेडिट योजने अंतर्गत महिलांना दिले जात आहेत 3 लाख रुपये? जाणून घ्या सत्य.
सध्या केंद्र सरकारच्या नावे खोट्या बातम्या, योजना यांचा प्रसार करत असल्याचं निदर्शनाला आल्यास पीआयबी फॅक्ट चेक या ट्वीटर अकाऊंट वर त्यामागील सत्यता सरकारी यंत्रणांकडूनच समोर आणली जात आहे. त्यामुळे तुम्हांलाही सोशल मीडीयात कुठे अशाप्रकारचे आर्थिक मदतीचे मेसेज आढळल्यास त्यावर थेट विश्वास ठेवू नका. सरकारी यंत्रणांकडून, त्यांच्याकडून पुष्टी केल्याशिवाय थेट तुम्हांला येणार्या मेसेजवर विश्वास ठेवू नका.