Fake News (Photo Credits: File Image)

केंद्र सरकार गरजूंना मदत करण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. ज्यांच्याकडे उत्पन्नाचे निश्चित साधन नाही अशा लोकांना मदत करणे हा त्याचा उद्देश आहे. शासनाच्या अनेक योजना रोजगारासाठी संघर्ष करणाऱ्या किंवा स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांसाठी आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून अशा योजनांबाबत (PM Yojana) अनेक खोट्या बातम्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. आताही अशीच एक बातमी व्हायरल झाली आहे, ज्यामध्ये दावा केला आहे की, पीएम योजनेअंतर्गत आधार कार्डवरून (Aadhar Card) कर्ज देण्यात येत आहे.

या संदेशामध्ये नमूद केले आहे की, ‘पीएम योजनाद्वारे आधार कार्ड कर्ज घ्या आणि वार्षिक 2 टक्के व्याज 50 टक्के माफ.’ हा संदेश व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी याबाबत विचारणा केली होती. त्यानंतर पीआयबीने याची सत्यता तपासली व त्यामध्ये ही बातमी खोटी असल्याचे दिसून आले.

याबाबत पीआयबीने ट्वीट करत माहिती दिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘तुम्हालाही पीएम योजनेअंतर्गत आधार कार्डवरून कर्ज दिल्याचा संदेश प्राप्त झाला आहे? हा संदेश खोटा आहे. हा एक फसवणुकीचा प्रयत्न असू शकतो व त्यामुळे असे फेक मेसेज शेअर करू नका.’ (हेही वाचा: कोरोना फंड अंतर्गत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून 5000 रूपये दिले जात असल्याचा खोटा मेसेज वायरल; PIB Fact Check ने केला खुलासा)

दरम्यान, याआधीही एक मेसेज व्हायरल झाला होता ज्यामध्ये दावा केला होता की, 'प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना' अंतर्गत तरूणांना दरमहा 3500 रूपये मिळतात.’ त्यानंतर हा मेसेजही खोटा असल्याचे समोर आले होते. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांच्या मनातील भीतीचा गैरफायदा घेत, अनेक समाजकंटकांनी खोटी वृत्त व्हायरल करून बनावट लिंक शेअर करून सामान्यांची लूट केल्याची प्रकरणे समोर आली आहेत, त्यामुळे पीआयबी फॅक्ट चेकने अशा संदेशावर विश्वास ठेऊ नका असे सांगितले आहे.