Fact Check (Photo Credit : Twitter)

फेसबुक, व्हॉट्सअॅप किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आजकाल फेक न्यूजचा (Fake News) सुळसुळाट झाला आहे. कोरोना विषाणू, लसीकरण, सरकारी निर्णय, सरकारी योजना अशा अनेक बाबतीत दिशाभूल करणाऱ्या बातम्या सोशल मिडियावर फिरत असतात. आता अशीच एक बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दावा करण्यात आला आहे की कोरोना विषाणूच्या उपचारासाठी सरकार तरुणांना 4000 रुपये देत आहे. प्रधानमंत्री रामबाण सुरक्षा योजना अंतर्गत ही आर्थिक मदत केली जात असल्याचे या मेसेजमध्ये म्हटले आहे.

या मेसेजसोबत एक लिंकही शेअर करण्यात आली आहे व म्हटले आहे की या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. नोंदणी करण्यासाठी आणि आपला फॉर्म भरण्यासाठी ती लिंक असल्याचे सांगितले आहे. पुढे असेही म्हटले आहे  की,  अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2021 असणार आहे, त्यामुळे लवकर फॉर्म भरा.

आता सरकारच्या पीआयबीने हा संदेश तपासला आहे. त्यांनी सांगितले आहे की हा मेसेज पूर्णतः खोटा आहे. सरकार अशी कोणतीही योजना (प्रधानमंत्री रामबाण सुरक्षा योजना) चालवत नाही. पुढे पीआयबी असेही म्हटले आहे की, अशा बनावट वेबसाइटवर तुमची वैयक्तिक माहिती शेअर करू नका व केंद्र सरकारच्या नावाने होत असलेल्या अशा फसवणुकीपासून सावध रहा. (हेही वाचा: सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत? जाणून घ्या या व्हायरल मेसेजमागील सत्य)

दरम्यान, सरकारशी संबंधित कोणतीही बातमी खरी आहे की खोटी हे जाणून घेण्यासाठी पीआयबी फॅक्ट चेकची मदत घेतली जाऊ शकते. कोणीही स्क्रीनशॉट, ट्विट, फेसबुक पोस्ट किंवा संशयास्पद बातमीचे URL PIB फॅक्ट चेकला WhatsApp नंबर 918799711259 वर पाठवू शकतो किंवा pibfactcheck@gmail.com वर मेल करू शकतो.