सध्या कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकटात प्रवासाबाबत कडक नियम केलेले असतानाही दिल्लीत (Delhi) विमानप्रवासात एक गोंधळ उडाला. दिल्लीतून पुण्याला येणाऱ्या एका विमानात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर सर्व प्रवाशांना खाली उतरण्यात आलं आणि संपूर्ण विमान सॅनिटाईज करुनच मग उड्डाण करण्यात आलं. दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Indira Gandhi International Airport) गुरुवारी (4 मार्च) संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली.
दिल्ली पुणे इंडिगो 6E 286 फ्लाईटमधील हा प्रकार आहे. दिल्लीहून पुण्याला निघालेल्या फ्लाईटमध्ये बोर्डिंग सुरु झालं. सर्व प्रवासी आपआपल्या जागा घेत असताना एका प्रवाशाला त्याच्या मोबाईलवर RTPCR कोरोना चाचणीचा रिपोर्ट आला. त्यानंतर मी कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे त्या प्रवाशाने विमानात सांगितले. हे ऐकल्यानंतर इतर प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला. ही माहिती मिळताच पायलटने विमान रनवेवरुन पुन्हा बे एरियामध्ये आणले.
फ्लाईटमधील क्रु मेंबर्संनी गोंधळलेल्या प्रवाशांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सर्व प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्यात आले. कोविड-19 पॉझिटीव्ह असलेल्या प्रवाशाला विमानतळावरील वैद्यकीय टीमकडे सोपवण्यात आले. या सर्व गोंधळानंतर संपूर्ण विमानाचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. त्यानंतर दोन तासांनंतर या विमानने पुण्याचे दिशेने उड्डाण केले. (विमान प्रवासात कोविड-19 संसर्गाचा धोका किती? जाणून घ्या, WHO चे मत)
दरम्यान, राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने दिल्ली, केरळमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी RTPCR टेस्ट करणं अनिवार्य करण्यात आली आहे. मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे. त्यामुळेच कोरोना नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.