कोविड-19 चा संसर्ग गेल्या काही दिवसांपासून राज्यांच्या अनेक शहरांमध्ये वाढत आहे. यात मुंबई, पुणे या शहरांचा समावेश आहे. दरम्यान, पुण्यामध्ये सप्टेंबर 2020 मध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या होती. मात्र सध्याच्या कोरोनाग्रस्तांची वाढ पाहता ही रुग्णसंख्या सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत निम्मापर्यंत जाईल, असा निष्कर्ष भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर) आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या संस्थांनी काढला आहे. त्यामुळे रुग्णसंख्येतील वाढ कमी करायची असल्यास नेमक्या काय उपाययोजना करायला हव्यात याचाही अभ्यास या संस्था करणार आहेत. त्यानंतर संस्थांकडून आलेल्या अहवालानुसार पुण्यात निर्बंध लागू करण्याचा निर्णय होईल, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरव राव यांनी दिली आहे.
यावर बोलताना राव म्हणाले की, आयसर आणि टीसीएस या संस्थांनी कोरोना रुग्णवाढ गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत सुमारे 50 टक्के होऊ शकते असा अंदाज वर्तवला आहे. मात्र यासाठी कोणत्या उपाययोजना करायच्या याचाही अभ्यास संस्था करत आहेत. आठ दिवसांत त्यांच्याकडून याबाबतचा अहवाल येईल आणि त्यानंतर पालकमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करुन निर्बंध लागू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल.
कोणते निर्बंध लागू शकतात?
# शाळा, महाविद्यालयं महिनाभर बंद ठेवणे.
# हॉटेल, रेस्टॉरंट मध्ये फक्त पार्सल सेवा सुरू ठेवणे.
# बार बंद करणे.
# लग्न समारंभांवर दोन महिन्यांसाठी निर्बंध लावणे.
सध्या पुण्यातील शाळा आणि महाविद्यालयं 28 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे अत्यावश्यक सेवा वगळता इतरांसाठी रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, शाळा-महाविद्यालये सुरु करण्याबाबत आज जिल्हाधिकारी आणि पुणे, पिंपरी-चिंचवड पालिकेचे आयुक्त यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, असेही राव यांनी सांगितले,