Pune Night Curfew: पुण्यात पुन्हा रात्रीची संचारबंदी; शाळा, महाविद्यालयं 28 फेब्रुवारी पर्यंत बंद
Curfew | Representational Image (Photo Credits: ANI)

राज्यात मागील काही दिवसांपासून पुन्हा कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांसह शहरांमध्ये परिस्थितीनुसार कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, पुण्यातही (Pune) कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पुन्हा एकदा रात्रीची संचारबदी (Night Curfew) लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतरांसाठी रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी असणार आहे. तर शाळा, महाविद्यालयं 28 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट रात्री 11 वाजेपर्यंतच सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. पुण्यातील कोविड-19 च्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.

विवाह सोहळे, समारंभ यांसदर्भातही आजच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. लग्नसमारंभासाठी पोलिसांची परवानगी आवश्यक असणार आहे. तसंच लग्न, इतर समारंभ यासाठी केवळ 200 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस 28 फेब्रुवारी बंद असणार असून उच्च शिक्षण घेणारे वर्ग अर्ध्या क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. हे सर्व नियम उद्यापासून लागू होणार आहेत. (कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता अनेक शहरांमध्ये नाईट कर्फ्यूचा विचार सुरु- मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार)

ANI Tweet:

दरम्यान, पुण्यात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार असल्याच्या बातम्या सोशल मीडिया माध्यमात फिरु लागल्या आहेत. त्यामुळे या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे. तसंच असे मेसेजेच फॉरवर्ड करणाऱ्याचे नाव, मोबाईल क्रमांक तसेच ग्रुपचे नाव स्कीन शॉटसह पाठवल्यास योग्य कारवाई करण्यात येईल असेही देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.