Amazon Jungle: काय सांगता? अमेझॉनच्या जंगलात घडला चमत्कार; कोलंबिया विमान अपघातानंतर 40  दिवसांनंतर 4 मुले जिवंत सापडली, एक फक्त 1 वर्षांचा
Amazon Jungle (संग्रहित संपादित प्रतिमा)

कोलंबियातील (Colombia) अॅमेझॉन (Amazon) जंगलात विमान अपघातानंतर 40 दिवसांनी 4 मुले जिवंत आढळली आहेत. लष्करातील जवानांना या चार मुलांना वाचवण्यात यश आले आहे. ही चार मुले भाऊ-बहीण आहेत. महत्वाचे म्हणजे यातील एक मुलगा हा अवघ्या एक वर्षांचा आहे. कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी मुले जिवंत सापडल्याच्या या घटनेचे वर्णन ‘ऐतिहासिक’ असे केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार 1 मे 2023 रोजी सेसना या खासगी विमानातून 7 लोक अराराकुराहून सॅन जोस डेल ग्वाविअरला जात होते. यावेळी इंजिनमध्ये बिघाड झाल्याने विमानाचा अपघात झाला. त्यानंतर विमान रडारपासून दूर गेले.

अपघाताच्या दोन आठवड्यांनंतर 16 मे रोजी विमानाचे अवशेष सापडले. यानंतर या अपघातात पायलटसह 3 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली, ज्यामध्ये या मुलांच्या आईचाही समावेश होता. मात्र अपघातानंतर चारही मुले बेपत्ता झाली होती. या मुलांच्या शोधासाठी कोलंबिया सरकार आणि लष्कराने ऑपरेशन होप सुरू केले होते.

लहान मुलांचा शोध घेण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या बचाव मोहिमेत 150 सैनिक, 200 स्वयंसेवक तसेच 10 स्निफर डॉग अॅमेझॉनच्या जंगलात उतरवण्यात आले. शोधमोहिमेदरम्यान लष्कराला घटनेच्या ठिकाणापासून 500 मीटर अंतरावर लहान मुलांच्या पायाचे ठसे, फळांचे तुकडे आणि नॅपकिन सापडले. मात्र, घनदाट जंगलात मुलांचा शोध घेणे फार अवघड होते. अशा स्थितीत लष्कराने हेलिकॉप्टरमधून मुलांच्या आजीचा आवाज रेकॉर्ड करून संदेश दिला. या मेसेजच्या माध्यमातून ही मुले कुठे आहेत ते शोधण्याचा लष्कराचा प्रयत्न होता. (हेही वाचा: Indigo Flight: अमृतसरहून अहमदाबादसाठी उडालेले विमान खराब हवामानामुळे पाकिस्तानात भटकले)

अखेर शुक्रवारी (9 जून 2023) मुले सापडली. लष्कराला जेव्हा ही मुले सापडली तेव्हा ती त्यांच्या पायाभोवती पॉलिथिन गुंडाळून पुढे जात होते. जंगलातून सुटका करण्यात आलेल्या मुलांची अवस्था अत्यंत वाईट होती. त्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता होती, शरीराला किडे चावले होते. या मुलांचे वय 13, 9, 4 आणि एक वर्ष आहे. अपघातानंतर 40 दिवस घनदाट जंगलात या मुलांचा जीव वाचणे चमत्कारापेक्षा कमी नाही.