व्हिडिओ: चमत्कारच! अख्खी ट्रेन अंगावर उभी राहिली तरी, रुळावर पडलेली महिला जिवंत
Miracle Video in Thakurli railway station | (Photo Credits: YouTube)

मुंबई मध्य रेल्वे (Mumbai Central Railway) मार्गावर असलेल्या ठाकुर्ली रेल्वे स्टेशन (Thakurli railway station) फलाटावर उभ्या असलेल्या प्रवाशांच्या काळजाचा ठोका एका घटनेने चुकला. समोरुन लोकल रेल्वे (Local Train) गाडी येताना दिसूनही एका महिलेने थेट रेल्वेरुळावर उडी घेतली. फलाटावर उपस्थित प्रवाशांनी हा प्रकार पाहिला. परंतु, काही क्षणांतच रेल्वे फलाटाला आली. त्यामुळे या महिलेची मदत कशी करायची हे प्रवाशांना क्षणभर कळले नाही. मात्र, गाडी फलाटाला पूर्ण लागल्यानंतर उभी राहिली. दरम्यानच्या काळात प्रवाशांनी महिलेला मदत करुन तिला बाहेर काढले. विशेष म्हणजे ही महिला जिवंत होती. अशा घटनांमध्ये संबंधित व्यक्ती जिवंत राहण्याची उदाहरणे फारच दुर्मिळ असल्याचा मुंबईकर प्रवाशांचा अनुभव. मात्र, या महिलेने हा अनुभव बदलला.

दरम्यान, कमल मोहन शिंदे (Kamal Mohan Shinde) (रा. खंबाळपाडा, डोंबिवली पूर्व) अशी या महिलेची ओळख आहे. गाडी फलाटाला लागत असताना तिने थेट रेल्वे रुळांवर उडी घेतली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून हा व्हिडिओ सोशल मीडियांतून व्हायरल झाला आहे. दरम्यान, गाडी फलाटाला लागत असताना एका महिलेने रेल्वेरुळावर उडी घेतल्याचे मोटरमनने पाहिले. त्याने गाडीचा वेग नेहमीपेक्षा अधिक कमी केला. मोटरमनने या महिलेला वाचविण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला. परंतू, गाडीचा वेग पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत जवळपास दोन डबे महिलेच्या अंगावरुन पुढे गेले होते. (हेही वाचा, Video : आत्महत्या करणाऱ्या आईचे मुलीने असे वाचवले प्राण)

दरम्यान, गाडी फलाटावर थांबताच उपस्थित प्रवाशांनी महिलेची मदत केली. तिला रुळ, फलाट आणि लोकल यांच्यामधून बाहेर काढले. या प्रकारानंतर फलाटावरील रेल्वे पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले आणि तिची चौकशी सुरु केली. मात्र, या चौकशीत नेमके काय पुढे आले याबाबत माहिती मिळू शकली नाही.