प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : Millennium Post)

धावत्या ट्रेनखाली आत्महत्या करणाऱ्या आपल्या आईला वाचवण्याच्या प्रयत्नात झालेल्या अपघातात आई आणि मुलगी दोघीही जखमी झाल्या आहेत. मुंबईच्या जोगेश्वरी स्थानकावर ही घटना घडली आहे. सुनिता विढळे (38) असे या महिलेचे नाव असून बुधवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमाराला ही घटना घडली. या घटनेत मायलेकी जखमी झाल्या असून सुनिता यांची प्रकृती गंभीर आहे.

28 नोव्हेंबर रोजी सुनिता यांनी हा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. जोगेश्वरी स्थानकाच्या फलाटावरून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या एका लोकलसमोर त्यांनी उडी मारली. त्यावेळी त्याच्यासोबत त्यांची 16 वर्षांची मुलगीही होती. प्रसंगावधान पाहून मुलीने सुनिता यांचा हात ओढून त्यांना ट्रेन समोरून बाजूला करायचा प्रयत्न केला. मात्र यात ट्रेनची दोघींनाही धडक बसली. त्यांच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात सुनिता यांना उजवा हात गमवावा लागला आहे.

 

घडलेला प्रकार पाहून हा आत्महत्येचा प्रयत्न असल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे, मात्र कुटुंबाने ही गोष्ट अमान्य केली आहे. त्या दोघी फक्त रेल्वे रूळ ओलांडून जात होत्या, त्यामुळे हा एक अपघात असल्याचे सुनिता यांचे पती संदीप यांचे म्हणणे आहे. रेल्वे पोलिसांनीही या घटनेची नोंद अपघात म्हणून केली आहे.