Mumbai High Court (Photo Credit: ANI)

पती अथवा कुटुंबातील इतर सदस्यांकडून महिलेला अपत्य जन्माला घालण्याची सक्ती करता येणार नाही. अपत्यप्राप्तीचा निर्णय महिलेच्या (पत्नी) संमतीशिवाय घेता येणार नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. एका महिलेने तिच्या पतीच्या संमतीशिवाय गर्भधारणा संपुष्टात आणण्याच्या निर्णयाला हिंदू विवाह कायद्यांतर्गत क्रूरता म्हणता येईल का? असा प्रश्न नुकताच मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) नुकताच चर्चेला आला होता. यावर न्यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फाळके यांच्या खंडपीठाने अधोरेखित केले की, स्त्रीला ‘मूल जन्माला घालण्यासाठी सक्ती करता येत नाही.

अपीलकर्त्याचा म्हणजेच पतीचा दावा जसा आहे तसा स्वीकारला गेला तरी, भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 नुसार प्रजनन निवडीचा स्त्रीचा अधिकार हा तिच्या (स्त्रीचा) वैयक्तिक स्वातंत्र्याचा अविभाज्य भाग आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. न्यायालयाने याच प्रकरणात मत नोंदवताना असेही म्हटले की, लग्नानंतर कामावर जाऊ इच्छिणाऱ्या महिलेला क्रूरता म्हणता येणार नाही. खंडपीठाने पतीने कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध दाखल केलेले अपील फेटाळून लावले. ज्यामध्ये वैवाहिक हक्क परत मिळवण्यासाठी पत्नीची याचिका मंजूर केली आणि हिंदू विवाह कायदा कलम १३(१)(आयए) आणि १३(१)(आयबी) अन्वये घटस्फोटासाठी पतीची याचिकाही फेटाळली. (हेही वाचा, Abortion Rights Judgement: गर्भापाताचा अधिकार कोणाला? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय; विवाहीत, अविवाहीत महिलांसाठी मोठी बातमी)

वय वर्षे 47 असलेल्या एका शिक्षक पतीने आपल्या पत्निपासून कोर्टाकडे घटस्फोट मागितला. या प्रकरणातील पत्नी असलेली महिलाही शिक्षिका आहे. पतीने आरोप केला की 2001 मध्ये त्यांच्या लग्नाच्या सुरुवातीपासूनच त्यांची पत्नी काम करण्याचा आग्रह धरत होती. पुढे तिने संमतीशिवाय तिची दुसरी गर्भधारणा संपुष्टात आणली. यावरुनच ती क्रुर असल्याचे लक्षात येते असा पतीचा युक्तीवाद होता. पतीने दावा केला की त्याची पत्नी 2004 मध्ये आपल्या मुलासह कधीही परत न येण्यासाठी घरातून निघून गेली.

दरम्यान, पत्नीने तिच्या वकिलामार्फत असा युक्तिवाद केला की तिने त्यांच्या पहिल्या अपत्याची प्रसूती केली आहे .जे तिला मातृत्वाचा स्वीकार दर्शवते. दुसरी गर्भधारणा तिच्या आजारपणात संपुष्टात आली आणि पतीने 2004-2012 पर्यंत तिला घरात परत आणण्यासाठी किंवा त्यांच्या मुलाच्या उदरनिर्वाहासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. शिवाय, ती व्यक्ती आणि त्याच्या बहिणी सतत तिच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने तिने घर सोडले.