महाराष्ट्र आणि कर्नाटक (Maharashtra-Karnataka border) सीमावादावरुन दोन्ही राज्यांतून तीव्र प्रतिक्रिया दिली जात आहे. तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. सध्या दोन्ही राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांच्या हाती यश आले आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यातील सीमा वाद मागील 50 वर्षांपासून अनिर्णीत अवस्थेत आहे. बेळगाव जिल्हयात मराठी भाषिकांचे प्राबल्य असतानाही बेळगावास महाराष्ट्रापासून तोडल्यामुळे येथील जनतेच्या भावना तीव्र आहेत. गेल्या 50 वर्षापासून बेळगावची जनता महाराष्ट्रात सामील होण्यासाठी झगडत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद नेमका काय आहे याची जाणून घेण्यासाठी खालील माहिती फायदेशीर ठरणार आहे.

बेळगाव जिल्ह्यावरुन महाराष्ट्र आणि कर्नाटकातील जनता एकमेकांच्या विरोधात आवाज उठवत आहे. बेळगाव-कारवार-निपाणी तसेच परिसरातील मराठी भाषिक जनता महाराष्ट्र राज्यात समाविष्ट होण्यासाठी आतूर आहेत. कर्नाटक राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार स्थापन झाले तरी सीमा भागातील मराठी भाषिक जनतेवर कानडी भाषा शिकण्याची सक्ती केली जाते. सीमा भागातील जनतेला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यास परवानगी मिळत नाही. यामुळे त्याठिकाणी राहत असलेली मराठी जनता लोकशाहीच्या मार्गाने आपल्या हक्कासाठी लढत आहे. हे देखील वाचा- Belgaum Dispute: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रकरणी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांचे मोठे विधान; 'महाराष्ट्राला एक इंच जमीन देणार नाही'

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद म्हणजे नेमका काय?

महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद गेल्या अनेक दिवसांपासून सुरुच आहे. कर्नाटक सरकार मराठी द्वेषी आहे अशी तिथल्या लोकांची भावना आहे. 2005 मध्ये बेळगांव महाराष्ट्रात सामील असा ठराव केल्यानंतर, तिथली महानगरपालिका बरखास्त करण्यात आली. पण ही बरखास्ती बेकायदा असल्यामुळे आंदोलने होऊन हा विषय परत चर्चेत आला. 1956 रोजी बेळगांवात मराठी लोकांचे स्पष्ट बहुमत होते आणि आजही तेथील 3/4 लोकसंख्या मराठी भाषिक आहे. यामुळे बेळगाव येथील जनता महाराष्ट्रात विलिनीकरण करण्यासाठी आग्रही आहे. परतु, बेळगाव जिल्हा कर्नाटकमध्ये असल्यामुळे तेथील जनतेचा विलिनीकरणाला विरोध आहे. तसेच महाराष्ट्राने बेळगाववर हक्क गाजवू नये, याकरिता कर्नाटकात अंदोलने करण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा संबंधित एक विधान केले होते. त्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाने आणखी पेट घेतला. त्यानंतर कर्नाटक येथील जनतेने उद्धव ठाकरे यांचा पुतळा देखील जाळला होता. यामुळे युवासैनिकांनी कोल्हापूर येथील थिएटरमध्ये सुरु असलेल्या कन्नड चित्रपट बंद पाडला होता.