Belgaum Dispute: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रकरणी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांचे मोठे विधान; 'महाराष्ट्राला एक इंच जमीन देणार नाही'
उद्धव ठाकरे (छायाचित्र सौ. पीटीआय )

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद (Belgaum Dispute) पेटला असून दोन्ही राज्यातून संतप्त अशा प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यातच कर्नाटकचे मुख्यमंत्री येदियुरप्पा (B. S. Yediyurappa) यांनी आक्रमक भुमिका घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टोला लगावला आहे. राजकीय फायद्यासाठी उद्धव ठाकरे यांनी बेळगाव सीमा मुद्दा उपस्थित केला असल्याचा आरोप येदियुरप्पा यांनी केला आहे. कर्नाटक नवनिर्माण सेनेचे नेते भीमाशंकर यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले. यावर महाराष्ट्रातील लोकांनी अंदोलन केल्याचे समजताच कर्नाटक येथे उद्धव ठाकरे यांचा पुतळा जाळण्यात आला. त्यानंतर या वादाने अधिकच पेट घेत असल्याचे समजते आहे.

महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावरुन बी.एस येदियुरप्पा यांनी संतप्त प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे. नुकतीच येदियुरप्पा यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, कोणता भाग कर्नाटक राज्याला मिळणार आणि कोणता भाग महाराष्ट्रात राहणार. हे महाजन समितीच्या अहवालात सर्व काही स्पष्ट झाले आहे. विनाकारण या वादाला चिघळले जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजकीय फायद्यासाठी सीमावाद पेटवत आहेत असा आरोपही येदियुरप्पा यांनी त्यावेळी केला. तसेच महाराष्ट्राला एक इंच जमीनदेखील देणार नाही, असेही विधान येदियुरप्पा यांनी केले आहे. हे देखील वाचा- सीमा प्रश्नाच्या वादावरुन महाराष्ट्र- कर्नाटक बस सेवा रद्द

बेळगाव येथे मराठी लोकांची संख्या अधिक आहे, परंतु, हा जिल्हा कर्नाटक राज्यात आहे. यावरुन महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. यातच रविवारी या वादाने नवे वळण घेतले आहे. याचा फटका कोल्हापूरवरुन कर्नाटकला जाणाऱ्या बस सेवेला बसला. सध्या ही बस सेवा सुरु असून अजूनही दोन्ही राज्यातून संतप्त प्रतिक्रिया देण्यात येत आहेत.