सीमा प्रश्नाच्या वादावरुन महाराष्ट्र- कर्नाटक बस सेवा रद्द
ST Bus (Photo Credits: Twitter)

बेळगावमध्ये भाषिक मुद्यावरुन वातावरण तापल्यामुळे खबरदारी म्हणून कोल्हापूरहून कर्नाटकच्या दिशेने ये- जा करणारी बस सेवा (Maharashtra-Karnataka bus service) रद्द करण्यात आली आहे. यामुळे कोल्हापूर ते कर्नाटक आणि कर्नाटक ते कोल्हापूर असा प्रवास करणाऱ्या नागरिकांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. सीमा प्रश्नाच्या वादाचा फटका बस सेवेला बसू नये, यासाठी प्रशासनाकडून बस सेवा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरुच आहे.

महापालिकेने त्रीभाषा धोरणाचा अवलंब केला आहे. त्यामुळे मराठीसह कन्‍नड आणि इतर भाषांचाही वापर करता येतो. पण मराठीचे प्राबल्य काही मराठीद्वेष्ट्यांना खटकत असल्याचे दिसत आहे. यातून काही जणांनी शुक्रवारी अंधाराचा फायदा घेत मराठी फलकावर दगडफेक केली. तसेच काही कन्‍नड कार्यकर्ते गेल्या काही महिन्यांपासून कन्‍नड फलकांची मागणी करत मराठी दुकानदारांना धमकावत असल्याचे प्रकार उघडकीस आले होते. सीमाप्रश्‍नावरुन महाराष्ट्रात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर बेळगावातील कन्‍नड संघटनेतील कार्यकर्त्यांकडून हालचाली होताना पाहायला मिळत आहे. जर मराठी फलकांना टार्गेट करून नुकसान केले जात असेल चोख प्रत्युत्तर देण्यात येईल, असा इशारा मराठी कार्यकर्त्यांनी दिला आहे. हे देखील वाचा-अण्णा हजारेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र; आपली सुरक्षा काढून घेण्याची मागणी, 'जनतेच्या पैशांचा अपव्यय नको'

महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यातील सीमा वाद मागील कित्येक वर्षांपासून खितपड पडला आहे. बेळगाव-कारवार-निपाणी परिसरातील मराठी भाषिक जनता महाराष्ट्र राज्यात समाविष्ट होण्यासाठी इच्छुक आहे. कर्नाटक राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार स्थापन झाले तरी सीमा भागातील मराठी जनतेवर कन्नड शिकण्याची सक्ती केली जाते.