अण्णा हजारेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र; आपली सुरक्षा काढून घेण्याची मागणी, 'जनतेच्या पैशांचा अपव्यय नको'
अण्णा हजारे (Photo Credits: IANS)

सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी शुक्रवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये त्यांनी स्वत: ला असलेली झेड प्लस सुरक्षा काढून घेण्याची मागणी केली आहे. पत्रात अण्णांनी लिहिले आहे की, 'मला कोणत्याही संरक्षणाची गरज नाही. जर काही अनुचित प्रकार घडला तर त्यासाठी मी स्वतः जबाबदार असणार आहे.'

महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून अण्णा हजारे यांनी 20 डिसेंबर पासून मौनव्रत पाळले आहे. राज्य सरकारने अलीकडेच महत्त्वपूर्ण व्यक्तींची सुरक्षा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये अण्णांची वाय श्रेणी सुरक्षा वाढवून झेड प्रकारात करण्यात आली आहे.

अण्णांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, 'मंदिरात राहणाऱ्या माझ्यासारख्या फकीराच्या संरक्षणासाठी सरकार अवाढव्य पैसे खर्च करीत आहे. लोकांकडून कर स्वरुपात मिळालेल्या पैशांचा गैरवापर करणे मला योग्य वाटत नाही. इतरांना संरक्षण दागिन्यांसारखे वाटू शकते, परंतु हे माझ्यासाठी वाईट आहे. काही लोकांनी मला धमकावले आहे पण मला मरणाची भीती वाटत नाही. मी सैन्यात असताना एकेकाळी मृत्यूलाही चकवा दिला होता. सुरक्षा असूनही कुणी मरणार नाही याची शाश्वती कोणालाही दिली जाऊ शकत नाही. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची कडक सुरक्षा असूनही हत्या करण्यात आली.’ (हेही वाचा: महिला अत्याचाराच्या मुद्द्यावरून अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी येथे आज पासून मौनव्रत)

अशाप्रकारे अण्णा हजारे यांनी आपली सुरक्षा काढून घेण्याची मागणी केली आहे. दरम्यान, भारतरत्न पुरस्काराने सन्मानित सचिन तेंडूलकरला आतापर्यंत 'एक्स' श्रेणी संरक्षण देण्यात आले होते. या प्रकारांतर्गत,सचिनच्या संरक्षणासाठी एक पोलिस रात्रंदिवस तैनात होता. आता ही सुरक्षा त्याच्याकडून काढून घेण्यात आली आहे. पण आता जेव्हा तो घराबाहेर पडेल तेव्हा त्याला पोलिस संरक्षण देण्यात येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांना ‘झेड’ श्रेणी सुरक्षा देण्यात आली आहे.