देशाची आर्थिक राजधानी मुंबईला (Mumbai) पाण्यापासून धोका असून ती बुडणार असल्याचा अहवाल यापूर्वीच अनेक आंतरराष्ट्रीय अभ्यासातून समोर आला आहे. आता हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात मुंबई शहर दरवर्षी 2 मिमी वेगाने बुडत असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामधील सुमारे 19 चौरस किमी क्षेत्रफळाचा परिसर दरवर्षी 8.45 मिमी वेगाने बुडत आहे. जिओफिजिकल रिसर्च लेटर्स जर्नलमध्ये मार्चमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात, जगातील 99 देशांमधील 2016 ते 2020 या कालावधीतील उपग्रह डेटाचा InSAR पद्धतीने अभ्यास करून हा निकाल प्रकाशित करण्यात आला आहे.
अमेरिकेतील र्होड आयलंड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या या अभ्यासानुसार चीनमधील तियानजिन शहर जगात सर्वात वेगाने बुडत आहे. त्याचा बुडण्याचा वेग वार्षिक 5.2 सेमी आहे. त्यानंतर इंडोनेशियातील तिआनजिन, सेमारंग (3.96 सेमी) आणि जकार्ता (3.44 सेमी), चीनमधील शांघाय (2.94 सेमी) आणि व्हिएतनाममधील हो ची मिन्ह (2.81 सेमी) आणि हनोई (2.44 सेमी) या शहरांचा क्रमांक लागतो.
भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्येचे शहर असलेल्या मुंबईबद्दल या अभ्यासात असे म्हटले आहे की, मुंबईच्या समुद्रसपाटीपासून 10 मीटरपेक्षा कमी उंचीच्या सुमारे 46 चौरस किमी क्षेत्रापैकी 19 चौरस किमी क्षेत्र असे आहे की दरवर्षी 8.45 मिमी इतके बुडते. मुंबईचे बुडण्याचे प्रमाण इतर जगाच्या तुलनेत सरासरी कमी आहे, परंतु समुद्राची वाढती पातळी आणि अतिवृष्टी यामुळे त्याचा परिणाम कालांतराने वाढू शकतो. याशिवाय अलीकडील अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जागतिक तापमानवाढीमुळे अरबी समुद्राच्या पाण्याची पातळी दरवर्षी 0.5 ते 3 मिमी वेगाने वाढत आहे. याचा अर्थ ज्या वेगाने जलस्तर वाढत आहे त्याच्या पेक्षा जास्त वेगाने मुंबईचा भाग पाण्याखाली जात आहे. (हेही वाचा: गेल्या नऊ महिन्यांत पुण्यात 3,850 विलंबित गृहनिर्माण पूर्ण, तर अजूनही 44,250 युनिट्स विलंबित)
मुंबई सतत पाण्यात बुडण्याची ही घटना भूगर्भीय प्रक्रियेमुळे होत आहे. हे मुख्यत्वे भूजल उत्खनन, खाणकाम, नैसर्गिक पाणथळ जमीन, पायाभूत सुविधा प्रकल्प आणि पर्यावरणीय बदल यामुळे घडत आहे. यावर कोणताही उपाय नाही, परंतु त्याचा त्याचा वेग कमी केला जाऊ शकतो. आगामी काळात मुंबईत पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. या समस्येला तोंड देण्यासाठी महापालिका आणि नगररचनाकारांनी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. मुंबईमधील भायखळा, कुलाबा, चर्चगेट, काळबा देवी, कुर्ला, अंधेरी पूर्व, मुलुंड, नाहूर पूर्व, दादर, वडाळा, ताडदेव, भांडुप, ट्रॉम्बे आणि गोवंडीच्या काही भागाला सर्वाधिक धोका आहे.