वसई (Vasai) पश्चिम येथील कार्डिनल ग्रेशर्स (Cardinal Gracias Hospital) हॉस्पिटल मधील डॉ. पूनम वानखेडे (Dr. Poonam Wankhede) यांच्यावर एका कॅन्सरच्या (Cancer) रुग्णावर क्षयरोगाचा (TB) उपचार केल्याचा आरोप लागवण्यात आला आहे, डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे लक्ष्मी अनिल सेठी (Laxmi Sethi) या कॅन्सरच्या रुग्णाचा मृत्यू झाला असे सांगत सेठी यांच्या परिवाराने काल हॉस्पिटल समोरच एक दिवसीय धरणा आंदोलनही केले होते, मात्र सेठी यांच्या कुटुंबियांचे सर्व आरोप रुग्णालयाच्या प्रशासनाकडून फेटाळून लावण्यात आले आहेत. याप्रकरणी हॉस्पिटलने आपण डॉ. वानखेडे यांच्या पाठीशी आहोत असेही म्हंटले आहे.
जाणून घ्या नेमका प्रकार
लक्ष्मी सेठी या 44 वर्षीय महिलेला फिट येत असल्याने 14 एप्रिल 2019 रोजी या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. वानखेडे यांच्या सांगण्यानुसार लक्ष्मी यांच्या विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या, या चाचण्यांच्या अहवालानुसार लक्ष्मी यांना टीबी असल्याचे सांगत त्या एका महिन्यातच बऱ्या होतील असा विश्वास डॉक्टरांनी दर्शवला होता, मात्र वास्तिवक परिस्थिती उलटच घडत गेली, बऱ्या होण्यापेक्षा लक्ष्मी यांची अवस्था दिवसेंदिवस आणखीनच खराब होत गेली, शेवटी, याप्रकरणी दुसऱ्या डॉक्टरचा सल्ला घेण्याचे ठरवले असता त्या, डॉक्टरांनी लक्ष्मी यांना कँसर आहे असे निदान केले. मुंबईकर तरुणाच्या पोटात आढळले गर्भाशय, जगातील सर्वात दुर्मिळ घटनेविषयी वाचा सविस्तर
यानंतर केलेल्या चाचण्यांमध्ये लक्ष्मी यांच्या पोटात एक गाठ आढळली होती, मात्र अजूनही ही गाठ टीबीची आहे असा दावा करत वानखेडे यांनी आपले उपचार सुरु ठेवले. अखेरीस हतबल होऊन लक्ष्मी यांच्या कुटूंबियांनी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात तपासणीकरीत नेले, जिथे ही गाठ कँसरचीच असल्याचे निश्चित झाले, पण दुर्दैवाने तोपर्यंत बराच उशीर झाला होता, व 4 मे रोजी लक्ष्मी यांचा मृत्यू झाला.
नातेवाईकांना देण्यात आली होती कल्पना
डॉ. पूनम वानखेडे यांनी उपचाराच्या दरम्यान सुद्धा लक्ष्मी यांची परिस्थिती चिंताजनक असल्याचे सांगून सेठी कुटुंबाला पूर्वकल्पना दिली होती, तसेच यात त्यांचा मृत्यू झाल्यास रुग्णालय जबाबदार नाही असे पत्रही लिहून मागितले होते, मात्र त्यावेळी सेठी कुटुंबाने ही मागणी नाकारली होती. त्यामुळेच आता या डॉक्टरांवर व रुग्णालयावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी सेठी कुटुंबियांकडून केली जात आहे
रुग्णालयाची भूमिका
रुग्णालय प्रशासन व डॉ. पूनम वानखेडे यांच्या बेजाबदारीमुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप लक्ष्मी यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आला असला रुग्णालयाने त्यांचे हे आरोप साफ खोटे असल्याचा दावा केला आहे. ज्यावेळी रुग्ण उपचारांसाठी आणण्यात आला होता तेव्हा चाचण्यांमध्ये टीबीचेच निदान झाले होते, यानंतर त्या आजाराचे स्वरूप बदलत गेल्याचे कळल्यावर उपचारात आवश्यक बदल सुद्धा करण्यात आले होते, तरीही जर का रुग्ण वाचला नाही तर त्यात डॉक्टरांची चूक नाही अशी भूमिका डॉ. वानखेडे आणि हॉस्पिटल कडून वर्तवण्यात येत आहे.