सध्याच्या कोरोना विषाणूच्या (Coronavirus) काळात समाजजीवन पूणर्तः ढासळून गेले आहे. या विषाणूच्या भीतीने लोक जास्तीत जास्त घरात राहत आहेत. अनेक लोकांना कोरोना पेक्षाही रुग्णालयांच्या बिलाची भीती सतावत आहेत. याआधी अनेकदा शासनाने ज्यादाच्या बिलाबाबत रुग्णालयांना फैलावर घेतले आहे, मात्र रुग्णालयांच्या बिल प्रक्रियेमध्ये काही बदल झाला नसल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रातील ठाणे (Thane) जिल्ह्यातील 17 खासगी रुग्णालयांनी (Private Hospitals) कोविड-19 रूग्णांकडून 1.82 कोटी रुपये अधिक वसूल केले आहेत. त्यापैकी अजूनही 1.40 कोटी परत केले गेलेले नाहीत. सोमवारी अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.
कल्याण आणि डोंबिवलीनंतर ठाणे शहरात कोरोना विषाणू रुग्णांच्या ज्यादाच्या बिलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा बिलांबाबत रुग्णांच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी, शहरातील 17 रुग्णालयांचे 4,106 बिले तपासण्यासाठी लेखा परीक्षकांची एक टीम गठीत केली. त्यानुसार 10 जुलै ते 21 ऑगस्ट या कालावधीमधील बिले तपासली गेली आणि त्यातील 1,362 बिलांमध्ये एकूण 1.82 कोटी ज्यादा आकारले असल्याचे आढळून आले.
ठाणे महानगरपालिकेने या रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर रुग्णालयांनी रूग्णांना 26.68 लाख रुपये परत केले. अद्याप 1.40 कोटी परत करणे बाकी असल्याचे समितीने म्हटले आहे. गेल्या महिन्यात घोडबंदर रोडवरील एका खासगी रुग्णालयाने जादा शुल्क आकारल्याने या रुग्णालयाचा परवाना निलंबित केला होता आणि कोविड-19 केंद्राच्या यादीतून त्या रुग्णालयाचे नाव काढून टाकण्यात आले होते. (हेही वाचा: औरंगाबाद येथे कोरोना व्हायरस उपचारासाठी 400 हून अधिक रुग्णांना ज्यादा बिल; ऑडिटनंतर रुग्णांची 24 लाखाची बचत)
आता जी 17 रुग्णालये शासनाच्या रडारवर आहे त्यामध्ये, वेदांत रुग्णालय, टायटन हॉस्पिटल, सिद्धी विनायक प्रसूती रुग्णालय, आरोग्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कौशल्य हॉस्पिटल, ठाणे हेल्थ केअर हॉस्पिटल, मेट्रोपॉल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, लाइफ केअर हॉस्पिटल, पानंदीकर हॉस्पिटल, स्वस्तिक हॉस्पिटल, एकता हॉस्पिटल, बेथनी हॉस्पिटल, नीलम रुग्णालय, काळसेकर हॉस्पिटल, वेल्लम हॉस्पिटल, स्वयं हॉस्पिटल आणि दिया मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, यांचा समावेश आहे.
दरम्यान, औरंगाबाद (Aurangabad) येथेही कोविड-19 रूग्णांकडून खाजगी रुग्णालयांनी उपचारासाठी ज्यादा बिले वसूल केली जाण्याची, किमान 400 उदाहरणे समोर आली आहेत. ऑडिट दरम्यान ही गोष्ट आढळली असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.