Malegaon Ready to Fight Heat Stroke: नाशिक जिल्ह्यात उन्हाच्या झळा वाढल्या असून, तापमानही प्रचंड प्रमाणात वाढले आहे. वाढते तापमान आणि उन्हामुळे नागरिकांना होणारा उष्माघाताचा त्रास विचारात घेऊन जिल्हा प्रशासनही कामाला लागले आहे. जिल्हा प्रशासनाच्या अंतर्गत येणाऱ्या मालेगाव (Malegaon) सामान्य रुग्णालयाने उष्माघातामुळे (Heat Strokes) जर काही विपरीत परिस्थिती निर्माण झाली तर त्यासाठी आवश्यक तयारी केली आहे. मालेगाव सामान्य रुग्णालयाने (Malegaon General Hospital) उष्माघाताने पीडित रुग्णांवर उपचार करण्यासाठी तीन कक्ष उभारले आहेत. वाचकांच्या माहितीसाठी असे की, मालेगावमध्ये पाठिमागील तीन दिवसांपासून 41 अंश सेल्सीअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे.
दरम्यान, मध्य महाराष्ट्रात तापमान वाढले असले तरी उष्मघाताचा त्रास मोठ्या प्रमाणावर झाल्याच्या तक्रारी अथवा घटना अद्याप तरी निदर्शनास आल्या नाहीत. मात्र, नाशिक, मालेगाव परिसरातील सातत्याने वाढते तापमान पाहता उष्माघाताचा त्रास होणारच नाही असे नाही. त्यामुळे संभाव्य खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासन आतापासूनच कामाला लागले आहे, असे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. मालेगाव हा उन्हाळ्यात उत्तर महाराष्ट्रातील सर्वात उष्ण प्रदेशांपैकी एक आहे. (हेही वाचा, How To Beat The Heat: उष्माघाताचा धोका टाळा! 'ही' लक्षणे दिसल्यास घ्या वैद्यकीय सल्ला)
दरम्यान, प्रशासकीय अधिकाऱ्यांचा हवाला देत 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, मालेगाव सामान्य रुग्णालयाने एकूण तीन कक्ष उभारले आहेत. त्यापैकी एक पाच खाटांची क्षमता असलेला आहे. दुसरा लहान मुलांसाठी आहे. ज्यात एकूण सहा खाटा आहेत. तर आणखी एक समान्य कक्ष आहे. ज्यात 16 खाटा आहेत. शहर आणि परिसरातील वाढते तापमान विचारात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
उष्माघात
उष्माघात ही एक गंभीर आणि संभाव्य जीवघेणी स्थिती आहे. जी जेव्हा शरीराचे मुख्य तापमान 104 अंश फॅरेनहाइट (40 अंश सेल्सिअस) वर वाढते तेव्हा उद्भवते. ही वैद्यकीय आणीबाणी मानली जाते आणि त्यावर त्वरित उपचार आवश्यक असतात. उष्माघात हा सामान्यत: उच्च तापमान दीर्घकाळापर्यंत टीकून राहिल्याने होतो. खास करुन उष्णतेमध्ये शारीरिक श्रम उच्च आर्द्रता आदी कारणांमुळे उष्माघात संभवतो. उष्माघाताचा त्रास होऊ लागल्यानंतर शरीराची नैसर्गिक शीतकरण यंत्रणा, जसे की घाम येणे बंद होते आणि शरीर त्याचे तापमान प्रभावीपणे नियंत्रित करू शकत नाही. अशा वेळी उष्माघाताचा त्रास संभवतो