![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/10/ragging-380x214.jpg)
Rajiv Gandhi Medical College Thane News: ठाणे महापालिका आयुक्तांनी यथील राजीव गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एकूण 9 विद्यार्थ्यांना निलंबीत केले आहे. या सर्व विद्यार्थ्यांवर रँगिग (Ragging Case Thane) केल्याचा आरोप होता. या प्रकरणात कारवाई करत निर्णय घेतल्याची माहिती अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. रॅगिंग विरोधी नियमांच्या अधिन राहून ही कारवाई करण्यात आल्याचे या पत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसाह हे महाविद्यालय ठाणे महानगरपालिकेद्वारे चालवले जाते. काही दिवसांपूर्वीच या महाविद्यालयात काही विद्यार्थ्यांनी रॅगिंग केल्याची तक्रार प्राप्त झाली होती.
रॅगिंग झाल्याची तक्रार प्राप्त होताच विद्यालय प्रशासनाने एक चौकशी समिती स्थापन केली. त्या समितीच्या चौकशीत काही विद्यार्थी दोषी आढळले. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार दोषी आढळलेल्या विद्यार्थ्यांना एक वर्ष वसतिगृह आणि शैक्षणिक वर्षासाठी निलंबीत करण्यात आले आहे.
महाविद्यालय वसतिगृहात रॅगिंग झाल्याची तक्रार विद्यापीठ अनुदान आयोग अर्थातच यूजीसीला सप्टेंबर महिन्यात प्राप्त झाली होती. त्यावर यूजीसीने सदर प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश महाविद्यालयाला दिले होते. त्यानंतर रॅगिंगविरोधी समितीने चौकशी सुरु केली. चौकशी समितीचा अहवाल येताच पालिका आयुक्त अभिजीत भांगर यांनी चौकशी समितीच्या अहवालावरुन कारवाई केली. त्याबबतचे प्रसिद्धीपत्रकही माध्यमांना देण्यात आले.
रॅगिंग हा महाविद्यालये, वसतिगृहे आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये केला जाणारा अघोरी प्रकार आहे. ज्यामध्ये नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना वरच्या वर्गातील, सीनिअर विद्यार्थी शाब्दिक किंवा शारीरिक शोषणाद्वारे त्रास देतात. कधी कधी हा त्रास अत्यंत वेदनादाई आणि कमालीचा अपमानास्पद असतो. जे विद्यार्थी या प्रकारातून जातात. त्यांच्या मनाव मोठा आघात होतो. यातून अनेकदा एकटेपणाच्या काही प्रकरणांमध्ये आत्महत्येसारख्या टोकाच्या घटनाही घडताना आढळतात. रॅगींगसारख्या छळवणुकीच्या माध्यमातून कनिष्ठांचे मनोधैर्य खच्ची करण्याचा आणि त्यांची बदनामी करण्याचा वरिष्ठ विद्यार्थ्यांच्या टोळक्याचा कल असतो.
महाराष्ट्रात रॅगिंगविरोधी कायदा अस्तित्वात आहे. सन 1999 मध्ये महाराष्ट्राने न्यायालयाच्या आदेशाने रॅगिंग विरोधी कायद्याचे विधेयक तयार केले. त्यास विधिमंडळात मान्यता देऊन राज्यपालांच्या सहीने त्याचे कायद्यातही रुपांतर केले. हा कायदा 15 मे 1999 रोजी महाराष्ट्र राज्याच्या राजपत्रात प्रथम प्रसिद्ध झाला. या काद्यानुसार रँगिंग झाल्याचे आढळून आल्यास कडक शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे. रॅगिंग प्रकारात एक किंवा त्याहून अधिक विद्यार्थी दोषी धरले जाऊ शकता. जर विद्यार्थी दोषी आढळून आल्यास शैक्षणिक वर्षातून निलंबन, दोन वर्षांपर्यंतचा कारावास अथवा दहा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा आहे. शिक्षाही गुन्ह्याच्या स्वरुपावर आधारीत असते.
कोणासोबत रॅगिंग झाल्यास 1800-180-5522 या टोलफ्री क्रमांकावर 24 तासात केव्हाही तक्रार करता येते. शिवाय helpline@antiragging.in या इमेल आयडीवर तक्रारही करता येते असे तज्ज्ञ सांगतात.