नागपूर मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालय (Nagpur Medical College) मधील हॉस्टेलवर पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसोबत रॅगिंग (Ragging) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या रॅगिंग बाबतची एक व्हिडीओ क्लिप देखील समोर आली आहे. दरम्यान सेन्ट्रल रॅगिंग समिती’कडून मेडिकल प्रशासनाकडे त्याची तक्रार येताच 6 विद्यार्थ्यांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. त्यांची 'इंटर्नशिप' आता रद्द करण्यात आली असून त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेडिकल प्रशासनाला सेंट्रल रॅगिंग कमिटीकडून एक व्हिडिओ मेलवर मिळाला आहे. त्यामध्ये सहा इंटर्न विद्यार्थी एका पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्याचं रॅगिंग करताना दिसत आहे. या तक्रारीनंतर मेडिकल प्रशासनाने तातडीने बैठक घेऊन चौकशी केली त्यामध्ये रॅगिंग झाल्याचं स्पष्ट झाले आहे. हे देखील नक्की वाचा: Forced Kiss: महाविद्यालयीन युवतीचे जबरदस्तीने चुंबन; 5 जणांविरोधात रॅंगींग, छेडछाड प्रकरणी गुन्हा दाखल.
मेडिकल प्रशासनाकडून सहा रेसिडेंटल डॉक्टरची इंटर्नशिप रद्द केली आहे. त्यांना वसतिगृहामधूनही बाहेर काढले आहे. दरम्यान या विद्यार्थ्यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. रात्री उशिरा पर्यंत ही कारवाई सुरूच होती. लोकसत्ताला दिलेल्या माहितीमध्ये मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी रॅगिंगच्या प्रकाराला दुजोरा दिला आहे. तसेच असा प्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचं देखील म्हटलं आहे.