महाराष्ट्राची 'मदर टेरेसा', अनाथांची आई अशी अनेक बिरुदे मिरवणाऱ्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे आज पुण्यात निधन झाले. त्यांचे वय 73 वर्षे होते. सिंधुताई यांनी पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. सिंधुताई यांना हर्नियाचा त्रास होता. नुकतेच त्यांच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती, मात्र त्यानंतरही त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नाही. गेले काही दिवस त्यांच्यावर गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. अखेर आता त्यांची प्राणज्योत मालवली. सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला. नको असताना मुलगी झाली म्हणून त्यांचे नाव चिंधी ठेवले.
परंपरावादी कुटुंबात जन्म झाल्याने सिंधुताईंना चौथ्या वर्गातच शाळा सोडावी लागली. वयाच्या 10 व्या वर्षी 26 वर्षांनी मोठ्या असलेल्या तरुणाशी त्यांचा विवाह झाला. काही वर्षांनी जेव्हा त्या गरोदर होत्या, तेव्हा नवऱ्याने चारित्र्यावरून संशय घेत त्यांच्या पोटावर लाथ मारून त्यांना घराबाहेर हाकलून दिले. यानंतर त्यांनी बेशुद्धावस्थेत गायीच्या गोठ्यात एका मुलीला जन्म दिला. यावेळी त्यांनी स्वतः दगडाने नाळ तोडली. त्यानंतर पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. कधी ट्रेनमध्ये भीक मागितली, तर कधी स्टेशनवर चतकोर भाकर, उष्टावलेले एखादे फळ मिळेल म्हणून फिरत राहिल्या. या सगळ्या गोष्टींनी त्यांना हादरवून सोडले होते. यावेळी त्यांनी अनेकवेळा आत्महत्या करण्याचा विचारही केला. पोट भरण्यासाठी, मुलीचे रक्षण करण्यासाठी त्या स्मशानभूमीतही राहिल्या. अखेर सर्वांमधून त्या कणखरपणे उभा राहिल्या.
Indian social worker, Padma Shri awardee #SindhutaiSapkal dies in #Pune: Report https://t.co/bv9Y6cZqHt
— Free Press Journal (@fpjindia) January 4, 2022
आपल्या या संघर्षमय काळात त्यांना समजले की देशात अशी अनेक अनाथ मुले आहेत ज्यांना आईची गरज आहे. तेव्हापासून त्यांनी ठरविले की जो कोणी अनाथ त्यांच्याकडे येईल, त्याची आई म्हणून संभाळ करेन. त्यांनी अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली इतर मुलांची काळजी घेताना आपल्या मुलीमुळे दुजाभाव व्हायला नको म्हणून त्यांनी आपली मुलगी ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले. (हेही वाचा: भिवंडीत एका वर्षाच्या मुलाचा पाण्याने भरलेल्या बादलीत बुडून दुर्दैवी मृत्यू)
सिंधूताईंच्या संस्थेत अनाथ मुलांचा सांभाळ केला जातो, त्याना प्रेम-माया दिली जाते. संस्थेच्या मार्फत सर्व मुलांना इथे शिक्षण दिले जाते. भोजन, कपडे अन्य सुविधाही पुरविल्या जातात. आज महाराष्ट्रात माईंचे चार अनाथआश्रम आहेत. काही वर्षांपूर्वी माईंनी चिखल द-यात वसतीगृह सुरु केले. आज ब-याच मुली या ठिकाणी राहून शिक्षण घेत आहेत. सिंधुताईंना त्यांच्या कार्याबद्दल सुमारे 750 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.