धक्कादायक! महाराष्ट्रातील खाजगी रुग्णालयांमध्ये 75 टक्के Covid-19 रुग्णांकडून आकारले ज्यादा बिल; अनेक कुटुंबे झाली कर्जबाजारी
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

कोरोना विषाणूच्या (Coronavirus) पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट फारच भयानक होती. दोन्ही लाटेवेळी अनेक रुग्णांना रुग्णालयात दाखल कारावे लागले होते. या साथीच्या काळात रुग्णांच्या कुटुंबियांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. औषधापासून ते आपल्या पेशंटला योग्य उपचार मिळावेत यासाठी कुटुंबातील सदस्यांची धावाधाव सुरु होती. आता महाराष्ट्रात झालेल्या सर्वेक्षणादरम्यान हे उघड झाले की, कोरोनामुळे ग्रस्त असलेल्या 75 टक्के रुग्णांना खासगी रुग्णालयांनी (Private Hospitals) अधिक शुल्क आकारले आहे. महाराष्ट्र सरकारने कोविड-19 रुग्णांच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांचे दर निश्चित केले होते, असे असूनही या रुग्णालयांनी ज्यादा शुल्क आकारले आहे.

आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कामगार संघटना जन आरोग्य अभियानाचे डॉ.अभय शुक्का म्हणाले की, उपचारादरम्यान सुमारे अर्ध्या रुग्णांचा (सर्वेक्षणाचा भाग असलेल्या रुग्णांचा) मृत्यू झाला. ते म्हणाले की आम्ही 2579 रुग्णांच्या प्रकरणांचे सर्वेक्षण केले, त्यांच्या नातेवाईकांशी बोललो आणि रुग्णालयाच्या बिलांचे ऑडिट केले. त्यानंतर खासगी रुग्णालयांनी ज्यादा पैसे आकारल्याचे समोर आले.

राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण करण्यात आलेल्या 2,579 रुग्णांपैकी आणि 95.4% रुग्णांनी खाजगी रुग्णालयात, तर 4.6% रुग्णांनी सार्वजनिक आरोग्य केंद्रात उपचार घेतले. यामध्ये प्रती रुग्ण सरासरी 10 हजारांपासून एक लाख रुपयांपर्यंत अधिक शुल्क आकारले गेले. यापैकी बहुतेक रुग्ण साथीच्या दुसऱ्या लाटेदरम्यान रुग्णालयात भरती झाले होते. सर्वेक्षणाचे निष्कर्ष धक्कादायक असून, राज्य अधिकाऱ्यांकडे बिलांचे सविस्तर ऑडिट करण्याची मागणी केली आहे.

डॉ. शुक्ला यांनी दावा केला की सर्वेक्षणातील रूग्णांमध्ये कमीतकमी 220 अशा महिला आहेत, ज्यांनी 1 लाख ते 2 लाख रुपये प्रत्यक्ष बिलापेक्षा जास्त भरले आहेत, तर 2021 प्रकरणांमध्ये रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांनी 2 लाख रुपये अधिक दिले आहेत. या महिन्यात हे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये महामारीच्या पहिल्या लाटेतील बाधित 317 रुग्ण आणि त्यांचे कुटुंब आणि दुसऱ्या लाटेतील 2,262 रुग्ण आणि त्यांचे कुटुंब यांचा समावेश करण्यात आला होता. (हेही वाचा: महाराष्ट्रातील रस्त्यांवरील खड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; CM Uddhav Thackeray यांनी सर्व यंत्रणांना बजावले समन्स)

सर्वेक्षण केलेल्या रूग्णांपैकी 1,294 बरे झाले, तर 1,295 रुग्णांचा संसर्गाने मृत्यू झाला. मृतांपैकी 1,059 असे पुरुष होते ज्यांच्या मागे पत्नी आणि मुले असे कुटुंब आहे. या सर्वेक्षणात रुग्णाच्या कुटुंबांना बाहेरून खरेदी करण्यास सांगण्यात आलेल्या औषधांच्या किंमतीचाही अभ्यास करण्यात आला. सार्वजनिक रुग्णालयात कुटुंबांनी बाहेरून आणलेल्या औषधांवर सरासरी 17,000 खर्च केले, तर खाजगी रुग्णालयामध्ये हा खर्च सरासरी 90,000 वर गेला. अशा प्रकारे महागडे उपचार व खासगी रुग्णालयांनी केलेल्या फसवणुकीमुळे अनेक कुटुंबे कर्जबाजारी झाली आहेत.