महाराष्ट्रात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. अशात राज्यातील रस्त्यावरील खड्यांचा (Pothole) प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याआधी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था पाहून अधिकाऱ्यांची चांगलीच शाळा घेतली होती. आता महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मंगळवारी रस्त्यांवरील खड्डे भरण्याबाबतच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी बैठक घेतल्यानंतर, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी बुधवारी रस्ते, पूल आणि उड्डाणपूल बांधण्याचे काम करणाऱ्या सर्व यंत्रणांना बोलावणे धाडले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत उद्धव ठाकरे बुधवारी संध्याकाळी सर्व नागरी, राज्य आणि केंद्रीय यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतील.
याआधी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (BMC) आयुक्त इक्बाल चहल यांनीही बैठक घेतली आणि नागरी अधिकाऱ्यांना 2-3 आठवड्यांच्या आत खड्डे प्राधान्याने भरण्यास सांगितले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मंत्र्यांनी शहरी आणि ग्रामीण भागातील रस्त्यांची स्थिती अतिशय खराब झाल्याचे सांगितले होते. राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांची स्थितीदेखील चांगली नसल्याचे ते म्हणाले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी सर्व यंत्रणांना समन्स बजावले आहे.
तत्पूर्वी, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी रस्त्यांच्या वाईट अवस्थेमुळे ठाणे नागरी संस्थेतील चार वरिष्ठ अभियंत्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले होते. चुकीचे काम करणारे अभियंते आणि कंत्राटदारांविरोधात पावले उचलावीत असेही ते म्हणाले होते. अशा निलंबनामुळे रस्ते दुरुस्तीचे काम अधिक दर्जेदार होते, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, बीएमसीने सर्व प्रशासकीय प्रभागांतील रस्ता अभियंत्यांना आपापल्या भागातील प्रत्येक रस्त्याला भेट देऊन खड्डे असलेले रस्ते ओळखण्यास सांगितले आहे. रस्ते अभियंत्यांना इतर कोणतेही काम देऊ नये आणि त्यांनी फक्त खड्डे भरण्यावर भर द्यावा, असे निर्देशही नागरी संस्थेने दिले आहेत. खड्डे दुरुस्त करण्यासाठी मुदत निश्चित करण्यात आली आहे. (हेही वाचा: Shiv Bhojan Thali: 1 ऑक्टोबर पासून मोफत शिवभोजन थाळींचे वितरण बंद; जाणून घ्या काय असेल प्रती प्लेट दर)
बीएमसीने सांगितले आहे की, मागणी मिळाल्यानंतर दोन दिवसांमध्ये सर्व प्रशासकीय विभागांना कोल्ड मिक्स आणि इतर आवश्यक बाबी पुरवण्यात याव्या. रस्त्यांवर खड्डे दिसताच ते भरण्याची प्रक्रिया एका दिवसात पूर्ण करावी. हे खड्डे रात्री भरले पाहिजेत असेही सांगण्यात आले आहेत, जेणेकरून दुरुस्तीच्या कामामुळे दिवसा वाहतुकीला अडथळा होणार नाही. तसेच कोणते खड्डे भरावे हे निश्चित केले आहे की नाही याची खात्री करण्यासाठी सहाय्यक आयुक्तांना स्पॉटला भेट देण्यास सांगितले आहे.