महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) लागू करण्यात आलेले लॉकडाऊन आणि निर्बंधांमुळे रोजंदारीवर काम करणाऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले होते. व्यवसाय बंद, पैसे कमावण्याचे साधन बंद अशा परिस्थितीत दिवसातून दोन वेळचे जेवण मिळणे हे अनेक लोकांसमोर मोठे आव्हान होते. ही समस्या लक्षात घेऊन उद्धव ठाकरे सरकारने गरजू आणि गरिबांना मोफत अन्न वाटप करण्याचा निर्णय घेऊन, मोफत शिवभोजन थाळीचे (Shiv Bhojan Thali) वाटप सुरु केले होते. मात्र आता कोरोनाची प्रकरणे आटोक्यात आली असल्याने, राज्य सरकारने मोफत शिवभोजन थाळी देणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
1 ऑक्टोबरपासून या थाळीसाठी पूर्वीप्रमाणे 10 रुपये मोजावे लागतील. तसेच पार्सल सुविधा देखील बंद करण्यात येणार आहे. पूर्वी शिवभोजन थाळीसाठी 10 रुपये मोजावे लागायचे, परंतु कोरोनाचे संकट सुरू झाल्यानंतर राज्य सरकारने त्याची किंमत कमी करून 5 रुपये ठेवली. त्यानंतर कोरोनाची दुसरी लाट आल्यावर सरकारने ही प्लेट मोफत देण्यास सुरुवात केली होती. मंगळवारी राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने यासंदर्भात आदेश जारी केला आहे.
1 ऑक्टोबरपासून शिवभोजन केंद्रांना दररोज दीडपट ज्यादा थाळी वाटप करण्याचे उद्दिष्ट बंद करून पूर्वीप्रमाणे प्लेट्सचे वाटप केले जाईल. शिव भोजन थाळीच्या मोफत वितरणाचा कालावधी 14 सप्टेंबर रोजी संपला आहे. सरकारचे म्हणणे आहे की राज्यातील कोरोनाचे प्रमाण कमी होताना दिसत आहेत. कोरोना प्रतिबंधही टप्प्याटप्प्याने शिथिल केले जात आहेत. हे पाहता शिवभोजन थाळीचे दर पूर्वीप्रमाणे 10 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (हेही वाचा: Mumbai: दुपारच्या जेवणावरुन भांडण झाल्याने 14 वर्षीय मुलीची आत्महत्या, पोलिसांकडून तपास सुरु)
दुसरीकडे, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दिवसभर राज्यातील 1320 शिवभोजन केंद्रांवर 1 लाख 90 हजार 230 शिवभोजन थाळीचे मोफत वाटप करण्यात आले. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर शिवभोजन थाळीचा लाभ दिला जातो. या थाळीत 30 ग्रॅमच्या दोन चपात्या, 100 ग्रॅम भाजी, 100 ग्रॅम भात, 100 ग्रॅम वरण नागरिकांना देण्यात येत आहे.