babasahep-purandhare (Photo Credit - Twitter)

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झाल आहे. आज सोमवारी पहाटे  वाजून 7 मिनिटांनी बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झाल्याची माहिती दीनानाथ मंगशेकर रूग्णालयाच्या प्रशासनाने दिली आहे. बाबासाहेबांवर मागील काही दिवसांपासून उपचार सुरु होते. ते 100 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगशेकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. येथील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपाचार सुरू होते. बाबासाहेब पुरंदरे यांचे पार्थिव सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी त्यांच्या पर्वती येथील निवासस्थानी नेण्यात येईल. अंत्यसंस्कार सकाळी 10 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत केले जातील,” असं दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने जारी केलेल्या प्रसिध्द पत्रकात म्हटलं आहे. (Shivshahir Babasaheb Purandare Passes Away: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा)

(Photo Credit - Twitter)

बाबासाहेबांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. बाबासाहेबांनी हयातभर शिवचरित्राचा ध्यास घेतला होता. शिवचरित्र सांगणं, ते लिहिणं आणि राजा शिवछत्रपतींचे विचार सगळ्यांपर्यत पोहचवण्याचे काम बाबासाहेबांनी केले. या कामासाठी त्यांना राज्यातील जनतेनं मोठा प्रतिसाद दिला. जाणता राजा ह्या महानाट्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास घराघरात पोहचला. हे महानाट्य फक्त महाराष्ट्रातच नाही तर आंध्र प्रदेश, गोव्यासह देशभरात नावाजलं गेलं. त्यांचा जन्म 29 जुलै 1922 सालचा. म्हणजे ते शंभरीत होते. बाबासाहेबांना इतिहासकार म्हणूनही ओळखलं जातं. त्यांनी फक्त शिवरायांचाच इतिहास लिहिला असं नाही तर पेशव्यांच्या इतिहासावरही प्रकाश टाकला आहे.

महाराष्ट्र सरकारने त्यांना सन 2015 मध्ये राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'महाराष्ट्र भूषण' देऊन गौरव केला होता. बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्रावर देश-विदेशात सुमारे 12 हजारांपेक्षा अधिक व्याख्याने दिली आहेत. त्याशिवाय, ललित कादंबरी लेखन, नाट्यलेखनही केले.  'सावित्री', 'जाळत्या ठिणग्या', 'मुजऱ्याचे मानकरी', 'राजा शिवछत्रपती', 'महाराज', 'शेलारखिंड', 'पुरंदऱ्यांचा सरकारवाडा', 'शनवारवाड्यातील शमादान', 'शिलंगणाचं सोनं', 'पुरंदरच्या बुरुजावरून', 'कलावंतिणीचा सज्जा', 'महाराजांची राजचिन्हे', 'पुरंदऱ्यांची नौबत' आदी साहित्य प्रकाशित झाले आहे.  राजा शिवछत्रपती या ग्रंथाच्या 16 आवृत्ती प्रकाशित झाल्या असून 5 लाखांहून अधिक प्रती प्रकाशित झाल्या आहेत.