महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी आदित्य ठाकरे यांच्या शिवाय 'या' दोन नेत्यांची नावे आघाडीवर
Uddhav Thackeray | (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदासाठी वरळीचे उमेदवार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)  यांचे नाव चर्चेत आहे. तसेच भावी मुख्यमंत्री पद आम्हाला हवे अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात येत असून ते आक्रमक झाले आहेत. याच परिस्थितीत शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांच्याशिवाय अन्य दोन नेत्यांनी नावे आघाडीवर असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. त्यानुसार शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांची नावे आघाडीवर असल्याचे वृत्त Tv9 यांनी दिले आहे.

वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांचा दणदणीत मताधिक्यांनी विजय झाला. त्यानंतर आता मुख्यमंत्री पदासाठी घौडदौड सुरु झाली आहे. मात्र सध्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची कमान भाजपचे देवेंद्र फडणवीस सांभाळत आहेत. परंतु विधानसभा निवडणूकीसाठी भाजप-शिवसेनेने महायुती करत एकत्रित निवडणूक लढवली. पण आता शिवसेनेने भाजपला 50-50 च्या फॉर्म्युल्याची आठवण करुन दिली आहे. त्यानुसार शिवसेना आणि भाजपकडे अडीच-अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्र पदाची कमान असणार अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांचे नाव जरी चर्चेत असले तरीही एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई सुद्धा या शर्यतीत आहेत.

तर ठाण्याचे सध्याचे आमदार एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेसाठी केलेले कार्य फार मोठे आहे. तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्यानंतर ठाण्यात शिवसेनेची सत्ता कायम टिकून ठेवण्यामागे एकनाथ शिंदे यांनी मोलाचे योगदान दिले आहे. दुसऱ्याबाजूला उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीय नेत्यांपैकी एक म्हणजे सुभाष देसाई यांची ओळख आहे. बाळासाहेब यांच्या पासून ते आता पर्यंत देसाई हे शिवसेनेसोबत एकनिष्ठाने काम करत आहेत. मुंबईतील महत्वाचा चेहरा म्हणून देसाई यांचे नाव आवर्जून घेतले जाते.(मुख्यमंत्री पदासाठी घौडदौड सुरु, गव्हर्नर यांना भाजप-शिवसेना एकत्रितपणे भेटणार नाहीत)

तसेच येत्या 30 ऑक्टोबरला भाजप अध्यक्ष अमित शहा उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे. त्यानुसार महायुतीत मुख्यमंत्रीपद आणि अन्य काही कारणावरुन सुरु असलेला तणाव कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.