ED विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार या बातम्या चूकीच्या; सुडाच्या कारवाईला कायद्यानेच चोख उत्तर देऊ: संजय राऊत
Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांपासून ईडी चौकशींवरून राजकारण तापायला सुरूवात झाली आहे. शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) आणि त्यापूर्वी महिनाभर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर शिवसैनिकांनी भाजपा ईडी सारख्या संस्थेचं हत्यार म्हणून वापर करत असल्याचं सांगत भाजपावर हल्लाबोल केला होता. आता यामध्येच मंगळवारी (5 जानेवारी) शिवसैनिक रस्त्यावर उतरतील. मुंबई बाहेरून काही शिवसैनिक शहरात दाखल होण्यास सुरूवात झाल्याची चर्चा मीडियामध्ये होती. मात्र या बातम्या चुकीच्या असल्याची माहिती संजय राऊत यांनी ट्वीट करून दिली आहे. नक्की वाचा: ED Office: शिवसैनिक आक्रमक! मुंबईतील ईडीच्या कार्यालयासमोरच लावला ‘भाजप प्रदेश कार्यालय' लिहलेला बॅनर.

संजय राऊत यांनी एका छापील बातमीचा दाखला देत, या चूकीच्या असल्याचं म्हटलं आहे. रस्त्यावर उतरायचं तेव्हा उतरू पण या कारणासाठी नाही. बेकायदेशीर व राजकीय सूडाच्या कारवाईला कायद्यानेच चोख उत्तर देऊ. कर नाही त्याला डर कशाला? शिवसेनेची शक्ती पाठीशी असताना प्रदर्शनाची गरज नाही. शिवसैनिकांची अस्वस्थता समजू शकतो असे देखील त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. Nitesh Rane on ShivSena: हाच का महाराष्ट्र धर्म? शेतकरी, मराठा आरक्षणासाठी नाही पण वैयक्तिक कारणांसाठी ED विरुद्ध मोर्चा काढणाऱ्या शिवसेनेला नितेश राणे यांचा सवाल.

संजय राऊत ट्वीट

दरम्यान वर्षा राऊत ईडी कार्यालयात चौकशीला गेल्या तर शिवसैनिक आणि महिला आघाडी त्यांच्या पाठी ठाम उभी राहण्यासाठी मोठी गर्दी करेल अशी भावना काही महिला शिवसैनिकांनी बोलून दाखवली होती. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस देखील शिवसेना भवन परिसरात महिला शिवसैनिकांनी मोठी गर्दी करत भाजपा विरुद्ध नारेबाजी केली होती.

संजय राऊत यांनी ईडी, सीबीआय सारख्या संस्थांचं अंधःपतन होत आहे. ईडीच्या नोटीशीला कागदाचा तुकडा संबोधत त्यांनी भाजपाला मुलं आणि बायकांच्या पदराआडून हल्ले करणं थांबवा असा सज्जड दम भरला आहे. वर्षा राऊत यांना 10 वर्षापूर्वी घेतलेल्या कर्जाबद्दल विचारत पीएमसी बॅंक घोटाळ्यामधील आर्थिक व्यवहारांमध्ये चौकशी करायचं आहे असं म्हटलं आहे. तर प्रताप सरनाईकांचं नाव टॉप सिक्युरिटीजच्या आर्थिक गैरव्यवहारातील लिंक दरम्यान चौकशीसाठी पुढे करण्यात आले आहे.