Nitesh Rane (Photo Credits: PTI)

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना ईडीने नोटीस बजावली आहे. यापूर्वी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना देखील ईडीने (ED) नोटीस धाडली होती. यावरुन आता शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. 5 जानेवारी रोजी ईडी विरोधात शिवसेना मोर्चा काढणार असून यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई आदी ठिकाणांहून शिवसैनिक सहभागी होणार असल्याचं वृत्त समोर येत आहे. यावरुन भाजपाचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शेतकरी, मराठा आरक्षण यांच्यासाठी न निघालेला मोर्चा वैयक्तिक उणी धूणी बाहेर निघायला लागल्यावर काढला जात आहे, असं म्हणत हाच का महाराष्ट्र धर्म? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "शिवसेना ED ऑफिसच्या बाहेर मोर्चा काढणार म्हणे.. हा मोर्चा मराठा आरक्षण साठी निघाला नाही.. हा मोर्चा शेतकऱ्यांसाठी निघाला नाही.. हा मोर्चा राज्याला केंद्र सरकारची अजून मदत मिळावी म्हणून निघाला नाही.. पण वैयक्तिक घरातली उणी धुनी बाहेर निघत आहे म्हणून मोर्चा! महाराष्ट्र धर्म?"

Nitesh Rane Tweet:

पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँकेच्या खात्यातून संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या 55 लाखांच्या व्यवहाराप्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस धाडली आहे. HDIL च्या वाधवान बंधूंना PMC बँक घोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आली असून हे प्रकरण त्याच्याशीच संबंधित आहे. तसंच वाधवान बंधूंचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांचीही चौकशी करण्यात आली आहे. प्रवीण हे संजय राऊत यांच्या जवळच्या मित्रांपैकी आहेत. (Sanjay Raut Tweets to Amit Shah: संजय राऊत यांचा इशारा 'आता बस्स!; आरोप सिद्ध करा किंवा कायदेशीर कारवाईला सामोरे जा')

दरम्यान, मुंबईतील गोरेगाव येथे HDIL एका पुनर्विकास प्रकल्पाचं काम करत होतं. मात्र त्यातील गडबड आढळून आल्याने वाधवान बंधून अटक करण्यात आली. यापूर्वी या प्रकरणाचा तपास EOW करत होतं. मात्र आता हे प्रकरण ED कडे सोपवण्यात आलं आहे.

दरम्यान, यापूर्वी संजय राऊत यांनी ईडी आणि सीबीआयला कुत्र्यांची उपमा देणारं व्यंगचित्र काढून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं.