ईडीविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार; 5 जानेवारीला मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, मिरा भाईंदरमधून शिवसैनिक मुंबईत दाखल होणार
Uddhav Thackeray, Shiv Sena party chief | (Photo Credit: File Photo)

शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीची नोटीस (ED Notice) आल्याने शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे येत्या 5 जानेवारीला शिवसेना ईडीविरोधात रस्त्यावर उतरणार आहे. यासाठी मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, मिरा भाईंदरमधून शिवसैनिक मुंबईत दाखल होणार आहेत. यापूर्वी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना आणि त्यांच्या दोन मुलांना ईडीने नोटीस पाठवली होती. त्यानंतर काही दिवसातचं संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवली. या कारवाईवर शिवसेनेने आता आक्रमक भूमिका घेण्याचं ठरवलं आहे.

वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस आल्यानंतर संजय राऊत यांनी भाजपवर टिकास्त्र डागलं होतं. ईडीच्या माध्यमातून नोटिसा पाठवून केंद्र सरकार महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. या सर्व प्रकारानंतर राऊत यांनी सामनामधून भाजप पक्षावर जोरदार टीका केली होती. येत्या 5 जानेवारीला वर्षा राऊत ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. त्यावेळी अनेक शिवसैनिक त्यांच्यासोबत हजर राहणार असल्याचंही म्हटलं जात आहे. (औरंगाबादचे संभाजीनगर नामांतराला विरोध करणा-यांना खरी शिवसेना दाखवून देऊ- चंद्रकांत खैरे)

यापूर्वी भाजप विरोधी अनेक नेत्यांना ईडीची नोटीस आली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या कारवाईमुळे सर्वसामान्य जनतादेखील टीका करताना पाहायला मिळते. भाजपच्या नेत्यांना ईडीच्या नोटीसा येत नाहीत. भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या प्रवेशात सोबत ईडीच्या नोटिसाबरोबर येतात, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केली होती. ('सामना' च्या भाषेबाबत चंद्रकांत पाटील यांनी अखेर संपादिका रश्मी ठाकरे यांना लिहिले पत्र, काय लिहिलय त्या पत्रात?)

दरम्यान, मागील वर्षी अनेक दिग्गज नेत्यांना ईडीने नोटिसा पाठवल्या होत्या. यात राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार, प्रताप सरनाईक, एकनाथ खडसे, वर्षा संजय राऊत, रत्नाकर गुट्टे यांना ईडीने नोटीस पाठवली होती. एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर काही दिवसातचं त्यांना ईडीने नोटीस पाठवली होती. एकनाथ खडसे यांना 30 डिसेंबरला ईडीच्या कार्यालयात हजेरी लावण्यासाठी समन्स बजावण्यात आलं होतं. परंतु, त्यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांनी चौकशीसाठी ईडीकडे वेळ मागितला आहे.