ED, CBI ला कुत्र्यांची उपमा देणारं कार्टून; संजय राऊत यांनी केलं शेअर (View Tweet)
Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

काही दिवसांपूर्वी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या घर आणि कार्यालयावर ईडी ने छापे टाकले. सरनाईक आणि त्यांचा पुत्र विहंग सरनाईक यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तसंच या प्रकरणासंबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी सरनाईक यांचे जवळचे मित्र अमित चांदोळे यांना अटक करण्यात आली. यावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. केंद्रात असलेल्या सत्तेचा गैरवापर केला जात असल्याचेही त्यांनी म्हटले होते. आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सीबीआय (CBI), ईडी (ED) या संस्थांना कुत्र्यांची उपमा देणारं एक कॉर्टून ट्विट केलं आहे.

संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या व्यंगचित्रात दोन कुत्रे उभे आहेत. एकावर सीबीआय आणि एकावर ईडी लिहिलेलं आहे. हे दोन्ही कुत्रे महाराष्ट्राच्या सीमेवर उभे असून या दोघांमध्ये संवाद सुरु आहे. सीबीआय लिहिलेलं कुत्रा पुढे उभे असलेल्या ईडी लिहिलेल्या कुत्र्याला म्हणतो, "थांब! अजून कोणाच्या घरी जायचे आहे हे अद्याप ठरलेले नाही."

संजय राऊत ट्विट:

हे कॉर्टून ट्विट करत या संस्था केंद्राच्या मर्जीने काम करत असल्याची टीका संजय राऊत यांनी भाजप वर नाव न घेता केली आहे. तसंच या संस्थांवर केंद्राचा अंमल असून महाराष्ट्राची गळचेपी करण्यासाठी त्यांचा वापर करत असल्याचे संजय राऊत यांचे पूर्वीपासूनच म्हणणे होते. मुख्यमंत्र्यासोबतच्या अभिनंदन मुलाखतीत देखील त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. दरम्यान, या कॉर्टुनवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

संजय राऊत आपला स्पष्टवक्तेपणा आणि रोखठोक विधानांमुळे प्रसिद्ध आहेत. दरम्यान, काल अभिनेत्री कंगना रनौत हिच्या पक्षात मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर भाजप नेत्यांकडून या निर्णयाचे जोरदार स्वागत झाले. त्यावर मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्या अभिनेत्रीशी तुम्ही सहमत आहात, असा थेट सवाल संजय राऊत यांनी केला होता.