Kangana Ranaut and Sanjay Raut | Photo Credits: Facebook PTI

अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिच्या मुंबईच्या पाली हिल येथील कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेने (BMC) केलेली कारवाई ही बेकायदेशीर होती असा निर्णय आज मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिला. या निर्णयाचे अनेक राजकीय नेत्यांनी स्वागत केले. तर काहींनी यावर टिका केली. यावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अभिनेत्री कंगना रनौतसह या निर्णयाचे स्वागत करणा-यांवरही टिका केली आहे. ज्या अभिनेत्रीने मुंबई पोलिसांना माफिया आणि मुंबईला पाकव्याप्त काश्मीर असा उल्लेख केला तिच्या मताशी सहमत आहात का असा सवाल कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

त्याचबरोबर जेव्हा न्यायाधीश वा न्यायालयांबद्दल असभ्य वक्तव्यांमुळे अवमान होतो मग जेव्हा कोणी महाराष्ट्र वा मुंबईबद्दल अशा प्रकारचे भाष्य केले जाते ते बदनामी नाही का असा सवालही संजय राऊतांनी विचारला आहे.

BMC ने 7 आणि 9 सप्टेंबर रोजी कंगना रनौत हिला जारी केलेल्या नोटीसा खारीज करत मुंबई उच्च न्यायालयाने कंगना रनौत हिच्या घरावर केलेली तोडक कारवाई बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे कंगनच्या प्रॉपर्टीच्या झालेल्या नुकसानाची पाहाणी करण्यासाठी अधिकारी नेमण्याचे आदेशही हायकोर्टाने दिले आहेत. या अधिकाऱ्याने कोर्टाला एक रिपोर्ट सुपूर्त करणे अपेक्षित आहे. त्या रिपोर्टची पाहणी करुन कंगना रनौत हिला नुकसान भरपाई देण्याचे आदेश जारी करण्यात येतील. तसंच कोर्टाने कंगना रनौतला सरकार आणि इतर व्यक्तींविषयी सोशल मीडियावर वादग्रस्त विधान करण्याबाबत समज दिली आहे.