Shiv Sena 53rd Anniversary: मराठी माणसांच्या हक्कासाठी झटणाऱ्या शिवसेना पक्षाच्या आतापर्यंतच्या प्रवासाच्या काही महत्वाच्या गोष्टी, जाणून घ्या
Shivsena (Photo Credits: PTI)

बाळ केशव ठाकरे उर्फ बाळासाहेब ठाकरे (Bal Thackeray) यांनी महाराष्ट्रात मराठी माणसांच्या हक्कासाठी अथांग प्रयत्न केले. तसेच मराठी माणसाला हक्क मिळवून देताना मध्ये अडथळा येणाऱ्या परिणांमाचा सुद्धा निडरपणे सामोरे जात त्यावर मात केली. बाळासाहेब यांचा जन्म 23 जानेवारी 1927 रोजी झाला. तर बाळासाहेबांचे वडिल प्रबोधनाकार ठाकरे त्या काळात एक उत्तम लेखनातूनस वक्तृत्वातून आणि त्यांच्या कार्यातून लोकजागरणाचा संदेश लोकांना देत असत. त्याचसोबत रूढी-परंपरांवर व जातिभेदात्मक वर्णव्यवस्थेवर कडाडून हल्ला चढवत होते. तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदानही महत्त्वपूर्ण होते. प्रबोधनाचा, पुरोगामी विचारांचा व आक्रमक वृत्तीचा प्रबोधनकारांचा वारसा बाळासाहेबांमध्येही कळत-नकळतपणे उतरला होता.

या सर्व घटनांनंतर बाळासाहेब यांनी प्रथम एक व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. तर 1950 रोजी त्यांनी 'फ्री प्रेस जर्नल' मध्ये व्यंगचित्रकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. मात्र पुढे बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वत:चे 1960 मध्ये 'मार्मिक' नावाचे साप्ताहिक सुरु केले. मार्मिक हे मराठीमधील पहिले व्यंगचित्र साप्ताहिक ठरले. महाराष्ट्राच्या उद्धारासाठी आणि मराठी माणसाच्या स्वाभिमान जागृतीसाठीच बाळासाहेबांनी मार्मिकची सुरुवात केली. संयुक्त महाराष्ट्र स्थापन झालेला होता. परंतु मुंबईत मराठी माणसावर अन्याय होत असल्याने या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मार्मिकाच्या सहाय्यातून वाचा फोडण्यात आली. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणाऱ्यांना बाळासाहेबांनी प्रथम व्यंगचित्रांच्या माध्यमातून वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला.बाळासाहेबांनी नेहमी 80 टक्के समाजकरण आणि फक्त 20 टक्के राजणकरण असे धोरण आखले होते.

त्यानंतरच्या काळात 1966 रोजी बाळासाहेबांनी पक्ष स्थापन करत 'शिवसेना' असे पक्षाला नाव दिले. महाराष्ट्रात त्यावेळी मराठी माणूसच मागे पडत होता. परंतु बाळासाहेबांनी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून मराठी माणसाला संघटित केले. तर शिवसेनेचा पहिला मेळावा 30 ऑक्टोंबर 1966 रोजी शिवतीर्थ म्हणजेच दादर येथील शिवाजी पार्क येथे आयोजित केला. या मेळाव्याला जवळजवळ पाच लाख लोकांनी आपली उपस्थिती दर्शवली. त्यानंतर शिवसेना पक्षाचा दबदबा सर्वत्र वाढत गेला आणि ठाणे, मुंबई यासारख्या शहरात शिवसेनेची लोकप्रियता अधिकच वाढू लागली.

(Shiv Sena 53rd Anniversary: शिवसेना वर्धापन दिन कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती?)

तसेच बाळासाहेबांनी आपल्या भेदक लेखन आणि वक्तृत्वासह सामना हे शिवसेना पक्षाचे मुखपत्र काढले. तर सामनाच्या संपादकीय अग्रलेखातून विविध घटनांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. शिवसेनाप्रमुखांच्या झंझावाती सभांमुळे-दौऱ्यांमुळे 1995 मध्ये शिवसेना-भारतीय जनता पार्टीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले, आणि मनोहर जोशी हे युतीचे पहिले मुख्यमंत्री बनले. स्पष्ट व रोखठोक भूमिकेमुळेच त्यांचे चाहते आणि शिवसैनिकानी त्यांना हिंदुहृदयसम्राट ही उपाधी त्यांना दिली.