Shiv Sena 53rd Anniversary: महाराष्ट्रातील एक प्रमुख पक्ष असलेला शिवसना (Shiv Sena) पक्ष हा आपला 53 वा वर्धापन दिन येत्या बुधवारी (19 जून 2019) रोजी साजरा करत आहे. शिवसेनेच्या या वर्धापन दिनानिमित्त साजऱ्या होणाऱ्या सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) उपस्थित राहण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. दरम्यान, शिवसेनेकडून मात्र याबाबत अधिकृतपणे काही सांगण्यात आले नाही. शिवसेना वर्धापन दिन कार्यक्रम षण्मुखानंद (Shanmukhananda Auditorium) सभागृहात सायंकाळी 5 वाजता पार पडणार आहे.
या कार्यक्रमासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख नेते आणि शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील ग्रामीण भागातील तालुकाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, जिल्हाप्रमुख, जिल्हा संपर्कप्रमुख, संपर्क संघटक, विधानसभा संपर्कप्रमुख यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी करावयाचा पाठपुरावा, शेतकरी आणि शेतमजुरांसाठी असलेल्या सरकारी योजनांची कार्यवाही यासंदर्भात या वेळी मार्गदर्शन शिबिरातून माहिती दिली जाणार आहे. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, शिवसेना उपनेते लक्ष्मण वडले आणि संभाजीनगर जिल्हाप्रमुख अंबादास दानवे हेसुद्धा या शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत. शिबिराचे प्रास्ताविक व संकल्पना शिवसेना उपनेते व समन्वयक विश्वनाथ नेरूरकर हे विशद करणार आहेत. (हेही वाचा, आदित्य ठाकरे लोकसभा निवडणूक 2019 लढवणार का? या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी केला मोठा खुलासा)
शिवसेनेचे जिल्हा पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व विरोधी पक्षनेते, नगराध्यक्ष, उपमहापौर, महापौर तसेच मुंबई व ठाणे शहरातील नगरसेवक आणि विभागप्रमुख यांनी आवर्जून उपस्थित राहायचे आहे, असे आवाहन शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद आहे. शिवसेनेचे सर्व नेते, उपनेते, खासदार, आमदार, सचिव, समन्वयक, संघटक तसेच मंत्री आणि इतर संलग्न संघटनेचे पदाधिकारीही याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.