Aaditya Thackeray (Photo Credits: Facebook)

ठाकरे घराण्याची चौथी पिढी सक्रिय राजकारणात उतरली आहे. अमित ठाकरे (Amit Thackeray) असो किंवा आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)  दोघेही पक्षाच्या बांधणीसाठी महाराष्ट्रात फिरतात, पक्षाच्या प्रचार मोहिमांमध्ये काम करतात. पण अजूनही ठाकरे घराण्यातून कोणीही थेट निवडणूकीच्या मैदानात उतरलेले नाही. आदित्य ठाकरे ही परंपरा यंदा मोडणार का? अशी चर्चा सगळीकडे असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeary) यांनी आदित्य यंदा निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

आदित्य ठाकरे यांनी भविष्यात निवडणूक लढवावी की नाही? हा निर्णय त्यांनीच घ्यावा. मात्र सध्या 2019 ची लोकसभा निवडणूक लढण्याचा कोणताच मानस नसल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी ही माहिती दिली आहे. लवकरच शिवसेनेच्या लोकसभा निवडणूक 2019 च्या उमेदवारांची यादीदेखील जाहीर केली जाईल अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

मंगळवारी रात्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची मातोश्री येथे भेट झाली. आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा झाली असून कोल्हापूरातून प्रचाराला सुरूवात होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आगामी निवडणूकीत दगाफटका होणार नाही याचीदेखील पुरेशी खबरदारी घेतल्याची माहिती देण्यात आली आहे. कालच सुजय विखे पाटील यांचा भाजपामध्ये प्रवेश झाला आहे ते अहमदनगर मतदारसंघातून निवडणूकीमध्ये उतरणार आहे.